"पहिल्यांदा कोणी बघतही नव्हतं, पण...", मराठी अभिनेत्रीने सांगितला 'लज्जा' सिनेमाच्या सेटवर घडलेला प्रसंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 15:17 IST2025-10-16T15:07:12+5:302025-10-16T15:17:01+5:30
मराठी अभिनेत्रीने सांगितला 'लज्जा' सिनेमात काम करण्याचा अनुभव, म्हणाल्या...

"पहिल्यांदा कोणी बघतही नव्हतं, पण...", मराठी अभिनेत्रीने सांगितला 'लज्जा' सिनेमाच्या सेटवर घडलेला प्रसंग
Sanyogita Bhave: मराठी सिनेसृष्टीत जम बसवल्यानंतर हिंदीतही आपली छाप उमटवणारे काही मोजकेच कलाकार आहेत. त्यातीलच एक नाव म्हणजे संयोगिता भावे. देखणा चेहरा, भाषेची उत्तम जाण, भाषेचा ऐकावासा लहेजा, कणखर आवाजाची देण, अभिनयाची हातोटी आणि तितकेच बोलके डोळे या वैशिष्ट्यांमुळे त्यांनी अनेक भूमिकांना न्याय दिला. 'उंच माझा झोका' मधली सुभद्रा काकू, मंथरा या त्यांच्या गाजलेल्या भूमिका आहेत. सध्या त्या स्टार प्रवाह वाहिनीवरील 'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेत काम करताना दिसत आहे. पण, तुम्हाला माहितीये का? संयोगिता भावेंनी बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलं आहे. नुकताच त्यांना हिंदी चित्रपटात काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे.
संयोगिता भावे यांनी माधुरी दीक्षित, रेखा स्टारर लज्जा सिनेमात काम केलं आहे. नुकत्याच राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या चित्रपटाच्या कास्टिंगचा किस्सा शेअर केला. त्याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, "मी एअर पॅनिक नावाची हॉलिवूडची फिल्म केली. त्यावेळी मी रामोजी फिल्मसीटीमध्ये होते. त्यादरम्यान, लज्जा सिनेमात काम करणारा माझा एक मित्र तिथे होता. तो माधुरीच्या स्टोरीमध्ये आहे. त्याने मला सेटवर बोलावलं. मी तिथे गेल्यानंतर त्याने राजजींच्या असिस्टंटसोबत माझी ओळख करुन दिली. तर त्याने राज कुमार संतोषी यांना माझ्याबद्दल सांगितलं. त्यांना भेटल्यानंतर मग त्यांनी मला चित्रपटात कास्ट केलं. त्यांनी आधी चित्रपटात कोणालातरी कास्ट केलं होतं पण ती परफॉर्म करु शकत नव्हती."
त्यानंतर सेटवरील अनुभव सांगताना संयोगिता यांनी म्हटलं,"या चित्रपटात माझा पहिला सीन गुलशन ग्रोवरबरोबर होता. त्यानंतर मग रेखा आणि मनीषा कोईरालासोबत सीन झाले.तो अनुभव फार वेगळा आहे. पहिल्यांदा सेटवर कोणी माझ्याकडे बघतही नव्हतं, स्पॉट बॉय असायचे त्यांना पाण्यासाठी वगैरे ओरडायला लागायचं. सीन सुरु व्हायच्या आधी राजकुमार संतोषी यांनी मला बोलावलं आणि ते म्हणाले, हा तुझा सीन आहे, त्यामुळे तुझं चांगला परफॉर्मन्स देण्यात प्रयत्न कर. त्यात रेखा आणि मनीषा कोईराला समोर होत्या."
रेखा यांनी दिलेला 'तो' सल्ला
मग पुढे त्या म्हणाल्या,"पहिल्या टेकनंतर तेव्हा रेखा मला म्हणाल्या, "तुला मी एक सल्ला देऊ का? मी तुझं थिएटमधलं काम पाहिलं आहे. सीनमध्ये तू जेव्हा माझ्या खांद्यावर डोकं ठेवून झोपते. त्याऐवजी मला मिठी मारुन रड. त्या सिनेमात माझी एक मैत्रीण काम करत होती. तेव्हा ती मला म्हणाली, लोक आधी तुम्हाला जज करतात. तुम्ही कशाप्रकारे काम करता हे ते पाहत असतात. मग तुम्हाला तो आदर मिळतो आणि तू ते कमवलं आहेस. पण, त्या गोष्टीचा मी कधीही गैरफायदा करुन घेतला नाही."