"चपातीबरोबर चटणी दिली तरी चालेल...", प्राजक्ताच्या घरच्यांनी विचारलेल्या प्रश्नावर होणाऱ्या जावयाने दिलेलं 'हे' उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 13:12 IST2025-11-24T13:05:01+5:302025-11-24T13:12:18+5:30
प्राजक्ता गायकवाडच्या होणाऱ्या नवऱ्याला घरच्यांनी विचारलेला 'हा' प्रश्न, अभिनेत्रीने सांगितला किस्सा

"चपातीबरोबर चटणी दिली तरी चालेल...", प्राजक्ताच्या घरच्यांनी विचारलेल्या प्रश्नावर होणाऱ्या जावयाने दिलेलं 'हे' उत्तर
Prajakta Gaikwad : मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड या नावाला कोणत्याही परिचयाची गरज नाही. अनेक गाजलेल्या मालिका आणि चित्रपटांमधून काम करत तिने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. मात्र, स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेने तिला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळवून दिली. सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. येत्या २ डिसेंबरला प्राजक्ता लग्नबंधनात अडकणार आहे. अशातच अलिकडेच प्राजक्ता गायकवाडने तिच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दलचा एक किस्सा शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने होणारा नवरा शंभुराज यांचं तोंडभरुन कौतुक केलं आहे.
नुकताच प्राजक्ता गायकवाडचा स्मार्ट सुनबाई हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.याच निमित्ताने ती वेगवेगळ्या ठिकाणी मुलाखती देताना दिसते आहे. नुकतीच तिने लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. या मुलाखतीत प्राजक्ता आपल्या लग्नाचा किस्सा सांगत म्हणाली, "माझ्या होणाऱ्या अहोंनी जेव्हा मला लग्नाबद्दल विचारलं तेव्हा माझ्या कुटुंबाने त्यांच्या कुटुंबीयांना असंच एकदा मुद्दाम विचारलं की, ‘तिला स्वयंपाक वगैरे येत नाही.मी माझ्या कुटुंबाचं पोट भरेल इतकं साधारण जेवण बनवू शकते. पण,तेव्हा माझ्या घरच्यांनी मुद्दाम विचारलं, तर उद्या लग्न झाल्यानंतर जर तुमची तक्रार असेल तर की तुमची मुलगी काहीच करत नाही. त्यावर त्यांनी छान उत्तर दिलं होतं, ते म्हणालेले,‘माझी काहीच हरकत नाही. मला चपातीबरोबर चटणी दिली तरी चालेल; पण मला हीच मुलगी पाहिजे.
पुढे प्राजक्ता म्हणाली,"हे खूप छान होतं. मला वाटतं की, तुमच्या होणाऱ्या कुटुंबाचा इतका चांगला सपोर्ट असेल आणि सासूबाईंचंही प्रेम असेल, तर ती मुलगी स्मार्ट सूनबाई बनायला वेळ लागणार नाही."
सासूबाईंचं कौतुक करत अभिनेत्री म्हणाली...
"माझ्या सासूबाईसुद्धा खरंच खूप गोड आहेत. खूप हौशी आहेत. मी साखरपुडा आणि लग्नाच्या निमित्तानं बघतेय की, माझ्याआधी त्यांची सगळी शॉपिंग झालेली असते. त्यांनी माझ्यासाठीसुद्धा आधीच शॉपिंग केलेली असते. आमच्या आवडी-निवडी बऱ्यापैकी सारख्याच आहेत. प्रत्येक गोष्टीत त्यांचा मला पाठिंबा असतो. सासरचे खूप काळजी घेणारे आहेत. त्यामुळे छान वाटतं."