'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चं सूत्रसंचालन करण्यास प्राजक्ता माळीने का दिलेला नकार; म्हणाली-" रिअॅलिटी शो..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 10:40 IST2025-09-28T10:35:55+5:302025-09-28T10:40:07+5:30
प्राजक्ता माळीने 'हास्यजत्रे'चं सूत्रसंचालन करण्यास पहिल्यांदा दिलेला नकार, काय होतं कारण?

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चं सूत्रसंचालन करण्यास प्राजक्ता माळीने का दिलेला नकार; म्हणाली-" रिअॅलिटी शो..."
Prajakta Mali : मराठी सिनेसृष्टीतील एक गुणी अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळीकडे पाहिलं जातं. 'जुळून येती रेशीमगाठी' यासारखी गाजलेली मालिका तसंच 'खो-खो', 'हंपी','विट- दांडू', ' फुलवंती' अशा चित्रपटांमध्येही धाटणीच्या भूमिका साकारुन तिने प्रेक्षकांचं प्रेम मिळवलं. प्राजक्ता माळीचा चाहतावर्ग फार मोठा आहे. अभिनयाबरोबरच ती गेली अनेक वर्ष टीव्हीवरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रम 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमाचं सूत्रसंचालनही करते आहे. या शोमध्ये तिचं वाह दादा वाह! हे वाक्य बरंच लोकप्रिय आहे. पण, तुम्हाला माहितीये का सुरुवातीला या शोचं सूत्रसंचालन करण्यास प्राजक्ताने नकार दिला होता.
नुकतीच प्राजक्ता माळीने 'MHJ Unplugged' या कार्यक्रमात हजेरी लावली. त्यादरम्यान, तिने सुरुवातीच्या काळात कोणत्याही रिअॅलिटी शोचं सूत्रसंचालन करणार असा निर्णय तिने घेतला होता. त्यानंतर ती महाराष्ट्राची हास्यजत्रा शोचं सूत्रसंचालन करण्यास कशी तयार झाली? याबद्दल तिने या गप्पांच्या कार्यक्रमात सांगितलं आहे. त्यादरम्यान अभिनेत्री म्हणाली," महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमधलं सूत्रसंचालन कदाचित माझ्या नशिबात होतं. मला आव्हान म्हणून किंवा अनुभव म्हणून नवनवीन गोष्टी करायला आवडतात. त्यामुळे मग आपण एक सत्र करु आणि मग दुसऱ्या सत्रासाठी नकार देऊ असं ठरवलं होतं. पण, मग दुसऱ्या सत्राच्या वेळी मला प्रसाद ओक म्हणाले. 'तू दुसरं सत्र पण कर हा... नाहीतर लोकांना वाटेल, तुला काढलं आहे.' तू शो सोडला आहे हे लोकांना कळणार नाही. त्यामुळे दुसरं सत्र कर, तुला हवं तर तिसरं सत्र करु नको."
प्राजक्ता माळी काय म्हणाली...
त्यानंतर पुढे प्राजक्ता माळी म्हणाली, "त्यानंतर पुढे काही ना काहीतरी गोष्टी येत राहिल्या आणि मग शो चालू राहिला. लॉकडाऊननंतर फक्त हाच शो चालू होता. त्याकाळात या शो कडे माझा बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला. आता हे पुण्यकर्म झालं आहे. आम्हाला तुझं काम आवडतं. तू किती छान दिसतेस, किती गोड हसतेस.... या अशा प्रतिक्रियांपेक्षा 'आम्ही तुम्हाला हसताना बघून हसतो'. 'तुमच्या कार्यक्रमामुळे आम्ही हसतो, आम्हाला आनंद मिळतो'. अशा लोकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. त्यामुळे मला जाणवलं की, हे पुण्यकर्म झालं आहे. त्यामुळे आता याला गालबोट लागता कामा नये." अशा भावना प्राजक्ताने मुलाखतीत व्यक्त केल्या.