"वेगळी मेकअप रुम नाही, एसीही नव्हता, पण तरीही...", धनश्री काडगावकरने सांगितला 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेत काम करण्याचा अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 15:16 IST2025-11-12T15:11:54+5:302025-11-12T15:16:35+5:30
धनश्री काडगावकरने सांगितला 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेत काम करण्याचा अनुभव, म्हणाली-"त्या संपूर्ण वाड्यात..."

"वेगळी मेकअप रुम नाही, एसीही नव्हता, पण तरीही...", धनश्री काडगावकरने सांगितला 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेत काम करण्याचा अनुभव
Dhanashri Kadgaonkar : छोट्या पडद्यावरील गाजलेली मालिकांपैकी एक मालिका म्हणजे तुझ्यात जीव रंगला. अभिनेता हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांची मुख्य भूमिका असलेल्या या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. त्यावेळी या मालिकेप्रमाणे त्यातील प्रत्येक पात्राचीही तितकीच चर्चा झाली. राणादा, पाठबाई, गोदाक्का, आबा आणि नंदिता, चंदा ही सगळीच पात्रं प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरली. मात्र, अभिनेत्री धनश्री काडगावकरने मालिकेत साकारलेली नंदिता भाव खाऊन गेली. अशातच नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये धनश्रीने या मालिकेच्या सेटवरील काही आठवणी शेअर केल्या आहेत.
नुकतीच धनश्रीने राजश्री मराठीला मुलाखत दिली. त्यादरम्यान,तिने तुझ्यात जीव रंगला मालिकेत काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे. त्याबद्दल बोलताना ती म्हणाली,"तुझ्यात जीव रंगला’चा तो वाडा कायम माझ्या आठवणीत राहील. कारण, चार वर्ष मी तिथे काम केलं. मी अनेकदा गंमतीत म्हणायचे की, इथे अशी एकही फरशी नसेल जिथे मी माझा सीन केला नाही. त्या संपूर्ण वाड्यात मी सीन केलेले आहेत. आणि माझे एका जागेवर सीन नसायचे. त्या वाड्यानं खूप प्रेम दिलं. ती जागाच खूप भारी होती. तो वाडा म्हणजे राहतं घर होतं. तिथलं कुटुंबही खूप चांगलं होतं. त्यांना कधी चहा करून द्याल का? असं विचारलं की, ते प्रेमानं चहा करून द्यायचे. किंवा तिथला आजूबाजूचा परिसर खूप कमाल होता. किती लोक मला म्हणायचे की, वहिनीसाहेब, तुम्ही यावर्षी उभ्या राहा. तुम्हाला तिकीट मिळतंय वगैरे. खूप मस्त होतं ते सगळं. त्या वाड्यातला अनुभव खूप मस्त होते. म्हणजे आमची कधी कधी इतकी गैरसोय व्हायची, पण तरीही ते फारच स्मरणात राहिलेले किस्से आहेत. कारण, एवढे लोक आम्हाला बघायला रोज यायचे. लंचपर्यंत खूप गर्दी झालेली असायची. आम्ही वरून बघायचो की, वॉशरूमला जायचं आहे, पण खाली गर्दी आहे का वगैरे आणि वॉशरूम खाली होतं."
त्यानंतर धनश्रीने म्हटलं,"एसी पण नव्हता. तिथे मेकअप रूम वेगळी नव्हती. एक मुलींची आणि एक मुलांची मध्ये फक्त फळी लावली होती. तेव्हा असं वाटायचं की, काय यार आपण कलाकार आहोत हे काय आहे वगैरे. पण, आम्ही तिथे रमलो. आम्हाला लोकांना बघावं लागायचं की, ते गेलेत का मग वॉशरूमला जाऊयात. कारण, लोकांसमोर कसं जाणार? तर असे खूप छोटे छोटे किस्से आहेत. कितीही गैरसोय असली तरी ती मालिका लोकांपर्यंत पोहोचली. ते पात्र पोहोचलं आणि त्याचं कौतुक अजूनही मी अनुभवत आहे. त्या वास्तूनं खूप काही दिलं. अंबाबाईच्या त्या शहरानं खूप दिलं. मी नुकतीच तिथे जाऊन आले आणि देवळात मी दोन तास बसून होते. मला खूप छान वाटतं." अशा खास आठवणी धनश्री काडगावकरने मुलाखतीत शेअर केल्या.