५ वर्षांची असताना हरवलेली अभिज्ञा भावे, सगळीकडे शोधाशोध केली पण सापडली भलतीकडेच! वाचा मजेशीर किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 13:26 IST2025-10-01T13:19:21+5:302025-10-01T13:26:18+5:30
५ वर्षांची असताना हरवलेली अभिज्ञा भावे, आई-वडिलांनी सांगितला 'तो' किस्सा

५ वर्षांची असताना हरवलेली अभिज्ञा भावे, सगळीकडे शोधाशोध केली पण सापडली भलतीकडेच! वाचा मजेशीर किस्सा
Abhidnya Bhave: अभिज्ञा भावे ही मराठी मालिकाविश्वातील नावाजलेली अभिनेत्री आहे. 'खुलता कळी खुलेना', 'तुला पाहते रे', 'तू तेव्हा तशी', 'रंग माझा वेगळा' अशा अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये तिने काम केलं आहे. मराठीसह हिंदीतही तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. सध्या अभिनेत्री तारिणी मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अशातच नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिज्ञाने तिचा अभिनय प्रवास आणि बालपणीचे मजेशीर किस्से शेअर केले आहेत.
नुकतीच अभिज्ञा भावेने तिच्या आई-वडिलांबरोबर 'राजश्री मराठी'ला मुलाखत दिली. त्यामध्ये अभिज्ञाच्या आई-वडिलांनी तिच्या लहानपणीचा एक मजेशीर किस्सा शेअर केला. लहानपणी शाळेच्या पहिल्याच दिवशी अभिज्ञा हरवली होती. याबद्दल सांगताना अभिज्ञाचे बाबा म्हणाले, "तिचा शाळेतील पहिला दिवस होता. त्यावेळेस मी बहुतेक सुटीवर होतो. अभिज्ञा शाळेतून घरी आली म्हणून घरी बोंबाबोंब सुरु झाली. आम्ही आजुबाजूला शोधाशोध केली शाळेच्या बसच्या ड्रायव्हरशी देखील चौकशी केली. त्याच्यानंतर मी शाळेत गेलो आणि तिथे शिपाई वगैरे यांच्याकडे देखील तिच्याबद्दल विचारलं. त्यावर ते म्हणाले, 'सगळी मुले घरी गेली कोणीही मागे राहिलं नाही', असं त्यांनी सांगितलं. पण, ही आमच्या बाजूच्या घरामध्येच सापडली. "
त्यानंतर अभिज्ञाच्या आई पुढे म्हणाल्या, "खरंतर झालं असं की, तिला बसने अलिकडच्या स्टॉपवर सोडलं. तिथून ती घरी चालत आली. त्यावेळी आमचं घर तिसर्या मजल्यावर होतं. तिथून ती आली आणि आमच्या शेजारी वाकणकर नावाचं कुटुंब राहत होतं. तेव्हा ती त्यांच्या घरी गेली आणि मस्त टेबलवर बसून त्यांनी जे काही खायला दिलं ते ती खात बसली होती. तर दुसरकीडे आजी-आजोबा घरातील सगळ्यांचे प्राण कंठाशी आले होते. ही मुलगी गेली कुठे? याचं सगळ्यांनाच टेन्शन आलं होतं. ती आठवण सर्वांच्या कायम लक्षात राहिली आहे. " असा किस्सा अभिज्ञाच्या आई-वडिलांनी शेअर केला.