"जय दुधाणे आणि हेमलतासारखी अटक विजय मल्याला कधी होणार?", मराठी अभिनेत्रीचा संतप्त सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 11:17 IST2026-01-05T11:17:21+5:302026-01-05T11:17:48+5:30
बिग बॉस मराठी फेम जय दुधाणे आणि अभिनेत्री हेमलता बाणे यांना पोलिसांनी फसवणुकीच्या आरोपांखाली अटक केली. जय दुधाणे आणि हेमलता बाणे यांना अटक झाल्यानंतर मराठी अभिनेत्रीने संतप्त पोस्ट शेअर केली आहे.

"जय दुधाणे आणि हेमलतासारखी अटक विजय मल्याला कधी होणार?", मराठी अभिनेत्रीचा संतप्त सवाल
गेल्या काही दिवसांत मराठी सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. बिग बॉस मराठी फेम जय दुधाणे आणि अभिनेत्री हेमलता बाणे यांना पोलिसांनी फसवणुकीच्या आरोपांखाली अटक केली. २८ डिसेंबर २०२५ रोजी अभिनेत्री हेमलता बाणे हिला एका बांधकाम व्यावसायिकाकडून १० कोटींची खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. तर जय दुधाणेला बनावट कागद पत्रे बनवून ५ कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी रविवारी(४ जानेवारी) अटक केली.
जय दुधाणे आणि हेमलता बाणे यांना अटक झाल्यानंतर मराठी अभिनेत्रीने संतप्त पोस्ट शेअर केली आहे. "जय दुधाणे आणि हेमलता बाणे यांना जशी अटक झाली तशी अटक विजय मल्यासारख्या लोकांना कधी होणार?" असा सवाल मराठी अभिनेत्री आरती सोलंकी हिने इन्स्टाग्राम पोस्टमधून विचारला आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिने म्हटलं आहे की "जय दुधाणे आणि हेमलता बाणे यांना मी सपोर्ट करत नाहीये. पण असे खूप लोक आहेत ज्यांनी हजारो कोटीची फसवणूक केली आहे. त्यांना कधी अटक होणार?".
हेमलता बाणेचं प्रकरण काय?
गोरेगाव इथल्या एका बांधकाम व्यावसायिकाकडून दहा कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकानं दोन महिलांना अटक केली. या प्रकरणात हेमलता बाणे (३९) आणि अमरीना मॅथ्यू फर्नांडिस (३३) अशी अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत. यातील हेमलता बाणे मराठी चित्रपटच सृष्टीतील अभिनेत्री आणि नृत्यांगणा असल्याची माहिती समोर आली आणि अनेकांच्या भूवया उंचावल्या.
जय दुधाणेला एअरपोर्टवरुन अटक
जय दुधाणेने बनवट कागदपत्र तयार करुन लोकांना दुकानं विकली. दुकानांच्या या विक्रीचा व्यवहार जयने बेकायदेशीरपणे झाल्याचे उघडकीस आले. त्यामुळे ही दुकानं खरेदी केलेल्या अनेक लोकांचं आर्थिक नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. जयने केलेली ही फसवणूक ५ कोटींची असल्याचं उघड झालं. त्यामुळे जय आणि त्याच्या कुटुंबाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी जयला विमानतळावरुनच अटक केली. याप्रकरणी फक्त जयच नव्हे तर त्याच्या कुटुंबातील आई, बहीण, आजी, आजोबा यांचीही चौकशी केली जाणार आहे.