मुंबईचा जावई होणार प्रसिद्ध मराठी अभिनेता, मेहेंदी सोहळ्याचा व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2024 11:13 IST2024-04-19T11:12:00+5:302024-04-19T11:13:52+5:30
मराठी अभिनेता शुभांकर एकबोटे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. त्याच्या घरी लग्नाची जय्यत तयारी सुरू आहे.

मुंबईचा जावई होणार प्रसिद्ध मराठी अभिनेता, मेहेंदी सोहळ्याचा व्हिडिओ व्हायरल
सध्या मराठी कलाविश्वात लगीनघाई सुरू आहे. गेल्या काही महिन्यात अनेक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकले आहेत. तर काही सेलिब्रिटी बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहेत. अनेक कलाकारांनी साखरपुडाही उरकला आहे. अशाच एका अभिनेत्याची सध्या लगीनघाई सुरू आहे. मराठी अभिनेता शुभांकर एकबोटे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. त्याच्या घरी लग्नाची जय्यत तयारी सुरू आहे.
शुभांकर एकबोटे अभिनेत्री अमृता बने हिच्याबरोबर लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. त्यांच्या विवाहपूर्वीच्या विधींना सुरुवात झाली असून नुकताच मेहेंदी सोहळा पार पडला. शुभांकरच्या हातावर अमृताच्या नावाची मेहेंदी रंगली. मेहेंदी सोहळ्यातील काही खास क्षणांचा व्हिडिओ शुभांकरने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. त्याच्या हातावर अमृताच्या नावाचा A असं लिहिलं आहे. त्याबरोबरच मुंबईचा जावई असंही शुभांकरने हातावर लिहिलं आहे. "हात माझा मेहेंदी माझी...रंग मात्र अमृताचा", असं कॅप्शन त्याने या व्हिडिओला दिलं आहे.
गेल्यावर्षी अमृता आणि शुभांकरने साखरपुडा करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. शुभांकर आणि अमृता कन्यादान मालिकेत नवरा बायकोच्या भूमिकेत होते. ऑनस्क्रीन जोडी खऱ्या आयुष्यातही लग्नगाठ बांधणार असल्याने चाहते खूश आहेत.