कौतुकास्पद! पूर आलेल्या गावात पोहोचले मराठी कलाकार, ७०० कुटुंबीयांना मदतीचा हात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 17:19 IST2025-10-06T17:18:48+5:302025-10-06T17:19:42+5:30
मराठी कलाकारांनीही पूरग्रस्त भागातील गावांना सढळ हाताने मदतकार्याची मोहीम हाती घेतली आणि बीड जिल्ह्यातील काही गावांपर्यंत ही मदत पोहोचवली. या मोहिमेत प्रसाद दाणी, ऋतुराज फडके, श्रेयस राजे, सौरभ पात्रुडकर, गौरव कुलकर्णी, ललित कुलकर्णी हे मराठी कलाकार सहभागी झाले होते.

कौतुकास्पद! पूर आलेल्या गावात पोहोचले मराठी कलाकार, ७०० कुटुंबीयांना मदतीचा हात
सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सोलापूर, बीड, धाराशिव जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. शेती वाहून गेल्याने शेतकरी बांधव हवालदिल झाले. तर जनजीवनही विस्कळीत झालं. पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आणि गावकऱ्यांचे मोडलेले संसार पुन्हा उभारण्यासाठी अनेक हात पुढे सरसावले. मराठी कलाकारांनीही पूरग्रस्त भागातील गावांना सढळ हाताने मदतकार्याची मोहीम हाती घेतली आणि बीड जिल्ह्यातील काही गावांपर्यंत ही मदत पोहोचवली.
या मोहिमेत प्रसाद दाणी, ऋतुराज फडके, श्रेयस राजे, सौरभ पात्रुडकर, गौरव कुलकर्णी, ललित कुलकर्णी हे मराठी कलाकार सहभागी झाले होते. या अभिनेत्यांनी स्वत: पूरग्रस्त भागात जाऊन गावकऱ्यांना स्वत:च्या हाताने मदत केली. याबद्दल श्रेयस म्हणाला, "मराठवाड्यात आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं. शेती, घरं, गुरं ढोरं सगळं वाहून गेलं. त्यांना खूप मोठा फटका बसला. पूरग्रस्त बांधवांना मदत करायची ह्या विचाराने आम्ही काही कलाकार मित्र एकत्र आलो आणि मदतकार्य उभं करण्याचं काम सुरू केलं. यामध्ये प्रसाद दाणी, ऋतुराज फडके, श्रेयस राजे, सौरभ पात्रुडकर, गौरव कुलकर्णी, ललित कुलकर्णी ह्यांचा समावेश आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कल्याण शाखेने सुद्धा ह्यात सहकार्य केलं. आम्ही केलेल्या मदतीच्या आवाहनामुळे सामान्य नागरिकांकडून खूप मोठी मदत उभी राहिली ज्यामुळे आम्ही बीड जिल्ह्यातील सुमारे ७०० कुटुंबांना मदतीचा हात देऊ शकलो. ह्यात बीड जिल्ह्यातल्या हिंगणी खुर्द, जेबापिंपरी, शिरापूर गात, फुलसांगवी, जांब, साक्षाळपिंपरी, कपिलधारवाडी, तरडगव्हाण, हिवरसिंगा, ढोकवड, आर्वी, मार्कडवाडी, हाजीपूर, गाजीपूर, कमलेश्वर धानोरा, उमरद जहागीर, बहादरपूर अशा गावांमध्ये ही मदत पोहोचली".
या मोहिमेत सहभागी झालेल्या सगळ्यांचे श्रेयसने आभार मानले आहेत. "सामान्य माणसाने ठरवलं तर तो काय करू शकतो ह्याचं हे उत्तम उदाहरण. आपला शेतकरी राजाच संकटात असेल तर त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे ह्या भावनेने आम्ही हे काम हाती घेतलं. आपण गोळा केलेली मदत योग्य हातात पोहोचली पाहिजे ह्या विचाराने आम्ही सगळे कलाकार स्वतः प्रत्येक गावात जाऊन तिथल्या नागरिकांच्या हातात ही मदत सुपूर्द करत होतो. आणि अखेर अथक परिश्रमांनंतर प्रत्येकाच्या हातात ती मदत पोहोचते आहे हे बघून खूप समाधान मिळालं. भविष्यात सुद्धा आमच्या हातून असं काम घडत राहो अशी इच्छा आहे. कारण कलाकार म्हणून आम्ही माणुसकी धर्म मानतो. वेळ पडेल तसे आपण आपल्या शेतकरी, कष्टकरी बांधवांच्या पाठीशी उभे राहूया. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ही आपलं आयुष्य जगण्याची प्रेरणा आहे. ज्यांनी ज्यांनी ह्या मदतकार्यासाठी आम्हाला सहकार्य केलं त्या सगळ्यांचे मनःपूर्वक आभार", असं तो म्हणाला.