'बिग बॉस मराठी'त वाईल्ड कार्ड एन्ट्री घेण्यापूर्वी संकेत पाठक म्हणाला, "कितीही प्लॅनिंग केलं तरी..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 14:06 IST2026-03-02T13:53:59+5:302026-03-02T14:06:01+5:30
बिग बॉसची ऑफर आताच आली का की हे आधीच ठरलं होतं?, संकेत पाठक म्हणाला

'बिग बॉस मराठी'त वाईल्ड कार्ड एन्ट्री घेण्यापूर्वी संकेत पाठक म्हणाला, "कितीही प्लॅनिंग केलं तरी..."
सध्या चर्चेत असलेल्या 'बिग बॉस मराठी सीझन ६' मध्ये नुकतीच वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे. एक दोन नाही तर तीन सेलिब्रिटींनी घरात वाईल्ड कार्ड म्हणून प्रवेश घेतला आहे. यामध्ये एक मराठीतला चॉकलेट हिरो, 'लग्नाची बेडी'फेम अभिनेता संकेत पाठकही आहे. संकेतच्या येण्याने आता राकेश बापटला टक्कर मिळणार आहे. दरम्यान घरात जायच्या आधी संकेतने लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. यावेळी तो काय म्हणाला वाचा.
बिग बॉसची ऑफर आताच आली का की हे आधीच ठरलं होतं? यावर संकेत पाठक म्हणाला, "खूप आधी तर असं काही ठरलं नव्हतं. आयुष्य सरप्राईज करत राहतं तसंच हे बिग बॉस आत्ता अचानक घडलं आहे. मी इतर रिएलिटी शोज बघितले आहेत. बिग बॉसही फॉलो केलं आहे. मराठी बिग बॉस पाहिलंय, हिंदी एवढं बघितलं गेलं नाही. मराठीत काही मित्र मंडळी होती म्हणून मग त्यांच्यासाठी बघायचो. त्या पद्धतीने बिग बॉस फॉलो केलंय."
बिग बॉस शोबद्दल तुला काय वाटतं? यावर तो म्हणाला, "मी एक शिकलोय की लोकांना फार जज करायचं नाही. टीका करायची नाही. कारण प्रेक्षक म्हणून पाहताना टीका करणं सोपं असतं. प्रत्यक्ष खेळताना ते अवघड असतं. कितीही प्लॅनिंग केलं तरी गेम आपल्याला खेळवत असतो. काहीही ठरवून जाता येत नाही. परिस्थितीनुसार सगळं बदलतं."
"घरात कसा खेळ खेळायचा हे मी असं काही ठरवलेलं नाही. जे आपल्या बाहेरुन दिसतं आणि जे प्रत्यक्षात घरात घडत असतं त्यात थोडा फरक असतोच. काही गोष्टी डोक्यात आहेत. तयारी केली आहे. जाऊन कळेलच." असंही तो म्हणाला.