लेक मनोरंजन विश्वात का आली नाही? 'आई कुठे काय करते'मधील 'अनिरुद्ध'ने स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 10:52 IST2025-09-25T10:50:07+5:302025-09-25T10:52:28+5:30
मिलिंद गवळी यांनी 'या' कारणामुळे मुलीला अभिनय क्षेत्रात येऊ दिलं नाही, म्हणाले- "या इंडस्ट्रीत..."

लेक मनोरंजन विश्वात का आली नाही? 'आई कुठे काय करते'मधील 'अनिरुद्ध'ने स्पष्टच सांगितलं
Milind Gawali: आपली एक वेगळी अभिनयशैली आणि रौबदार आवाजासाठी ओळखले जाणारे अभिनेते म्हणजे मिलिंद गवळी. आजवर त्यांनी अनेक मराठी चित्रपट, मालिकांमध्ये नायक आणि खलनायकाच्या भूमिका साकारुन प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. मिलींद गवळी या सोशल मीडियावरही हल्ली बरेच सक्रिय झाले आहेत. आपल्या पत्नी, कुटुंबियांबरोबरचे खास क्षण ते चाहत्यांसोबत शेअर करतात. त्यांना एक मुलगी देखील आहे. मात्र, ती अभिनय क्षेत्रात सक्रिय नसून फिटनेस ट्रेनर आहे. अशातच नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये मिलिंद गवळी यांनी त्यांची लाडकी लेक या क्षेत्रात का आली नाही, याबद्दल भाष्य केलं आहे.
मिलींद गवळी हे नाव फक्त मराठी पुरतंच मर्यादित न राहता त्यांनी हिंदीतही आपल्या अभिनयाची एक वेगळी छटा उमटवली आहे. नुकतीच त्यांनी लाडकी लेक आणि जावयासह 'लोकमत फिल्मी'च्या सेलिब्रिटी किड्स या विशेष सेगमेंन्टमध्ये हजेरी लावली. त्यादरम्यान, या बाप-लेकींने भरभरुन गप्पा मारल्या.त्यावेळी मिलिंद गवळी यांनी लेक मिथिला मनोरंजन क्षेत्रात न येता वेगळंच क्षेत्र का निवडलं यावर प्रतिक्रिया दिली. या मुलाखतीमध्ये ते म्हणाले, "मिथिला सौंदर्याच्या बाबतीत कोणत्याही हिंदी किंवा मराठी अभिनेत्रीला मात देईल. ती खूप हुशार आहे. मला माहित होतं जर मी तिला प्रोत्साहन दिलं असतं तर तिने इंडस्ट्रीत तिची एक छाप सोडली असती. तिने पडद्यावर उत्तम अभिनयही केला असता."
मला त्रास झाला...
यानंतर पुढे ते म्हणाले, "मला वाटतं की मीच चुकीच्या क्षेत्रात आलो. कारण, मी एक अप्रशिक्षित नट आहे. अभिनय क्षेत्र हे खूप छान आहे. त्यामुळे बऱ्याचदा भूमिका साकारताना त्याचा मला ताण येतो, त्रास होतो. आई कुठे काय करते मधील अनिरुद्ध देशमुख मी ५ वर्ष साकारला. ती भूमिका करताना मला त्रास झाला. रात्री उशीरापर्यंत काम करावं लागतं. खीीप दबाव असतो. तर तो ताण कसा कमी करायचा. बरेच असे कलाकार मी पाहिले आहेत ज्यांना हा यावर कशी मात करायची हे कळलं नाही.त्यामुळे ते व्यसनाच्या आहारी गेले. खूप लवकर निघून गेले. "
राष्ट्रीय पुरस्कार मिळूनही काम मिळत नाही...
"आम्ही फक्त पडद्यावर छान दिसतो. आम्ही लोकप्रिय आहोत हे दिसतं. पण, त्यामागे आम्ही भावभावनांशी खेळत असतो. त्यामुळे मला क्षेत्र तिच्यासाठी योग्य वाटलं नाही. मिथिला यावर देखील मात करुन लोकप्रिय होईल. पण, या क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार मिळूनही काम मिळत नाही. शिवाय तुमच्यात टॅंलेट असूनही काम मिळत नाही. "असं मत त्यांनी या मुलाखतीत मांडलं.