आपल्या मातीतल्या शेतकऱ्यांसाठी मराठी कलाकार पुढे सरसावले, पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 14:02 IST2025-09-29T14:00:22+5:302025-09-29T14:02:00+5:30
मराठी कलाकारांनी पूरग्रस्त भागातील गावांना सढळ हाताने मदतकार्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत सहभागी होऊन जास्तीत जास्त मदत पोहोचवण्यासाठी अभिनेता श्रेयस राजेने नागरिक आणि चाहत्यांना आवाहन केलं आहे.

आपल्या मातीतल्या शेतकऱ्यांसाठी मराठी कलाकार पुढे सरसावले, पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सोलापूर, बीड, धाराशिव जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी बांधव हवालदिल झाले आहेत. जनजीवन विस्कळीत झालं आहे. पूरग्रस्त भागातील गावकऱ्यांना सर्वोतोपरी मदत केली जात आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मराठी कलाकारही पुढे सरसावले आहेत. मराठी कलाकारांनी पूरग्रस्त भागातील गावांना सढळ हाताने मदतकार्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत सहभागी होऊन जास्तीत जास्त मदत पोहोचवण्यासाठी अभिनेता श्रेयस राजेने नागरिक आणि चाहत्यांना आवाहन केलं आहे.
श्रेयस व्हिडीओत म्हणतो, "आपल्या सगळ्यांनाच माहितीये की आपल्या महाराष्ट्रात सोलापूर, बीड, धाराशिव या ठिकाणी भयंकर पूर आलेला आहे. जनजीवन अक्षरश: विस्कळीत झालं आहे. लोकांचे संसार वाहून गेले आहेत. शेतकरी बांधव हवालदिल झालाय. या सगळ्या परिस्थितीत तिथल्या लोकांना आता आपल्या मदतीची प्रचंड गरज आहे. त्यामुळेच आम्ही काही कलाकार मिळून अखिल भारतीय नाट्यपरिषद कल्याण शाखेच्या मदतीने एक मदतकार्य करण्याचा प्रयत्न करत आहोत. खरं तर २५ सप्टेंबरपासूनच हे मदतकार्य सुरू झालं आहे. आणि मदत गोळा करण्याची मुदत ही ३० सप्टेंबरपर्यंत आहे. आता दोनच दिवस राहिलेत त्यामुळे हा व्हिडीओ करतोय. जेणेकरून हा व्हिडीओ सगळ्यांपर्यंत पोहोचेल आणि मदतीचा ओघ आणखी वाढेल".
"तिथल्या लोकांना अत्यंत मुलभूत गरजा भागवण्याची गरज आहे. त्यांना चादरी, सुके खाद्य पदार्थ, औषधे यांची गरज आहे. ही मदत आचार्य अत्रे रंगमंदीर कल्याण येथे संध्याकाळी ४ ते ८ या वेळेत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आत्तापर्यंत बऱ्याच लोकांनी मदत केली आहे. तुम्ही कल्याणमध्ये राहत नसाल तर तुम्ही आम्हाला शक्य तितकी आर्थिक मदत करू शकता. त्यातून आम्ही त्यांना लागणाऱ्या उपयोगी वस्तू विकत घेऊ. ३० सप्टेंबरनंतर या सगळ्या गोष्टी आम्ही धाराशिव, बीड या ठिकाणांमध्ये वाटणार आहोत. त्या सगळ्यांना आता आपल्या आधाराची खूप जास्त गरज आहे. हा व्हिडीओ शक्य तितका शेअर करा. जेणेकरून आपण खूप जास्त मदत करू शकू. आपल्या एका मदतीमुळे उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबाना उभं राहण्यास बळ मिळेल", असं म्हणत त्याने चाहत्यांना आवाहन केलं आहे.
याबरोबरच श्रेयसने आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओतून पूरग्रस्तांसाठी चालवण्यात येत असलेल्या मोहिमेत मराठी कलाकार हातभार लावत असल्याचं दिसत आहे. जास्तीत जास्त लोकांना मदत करण्याचं आवाहन त्याने व्हिडीओतून केलं आहे.