"तुमचा मुलगा बायकांना मारतो अन्...", मालिकेतील काम पाहून किरण गायकवाडची आई संतापलेली; अभिनेत्याला थेट घराबाहेर काढलेलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 17:01 IST2025-10-13T16:45:19+5:302025-10-13T17:01:10+5:30
"तुमचा मुलगा बायकांना मारतो अन्...", 'त्या' तक्रारीवरून किरण गायकवाडला आईने घराबाहेर काढलेलं, वाचा किस्सा

"तुमचा मुलगा बायकांना मारतो अन्...", मालिकेतील काम पाहून किरण गायकवाडची आई संतापलेली; अभिनेत्याला थेट घराबाहेर काढलेलं
Kiran Gaikwad: नुकताच झी मराठी २०२५ हा पुरस्कार सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात प्रत्येक कलाकाराला भेटायला त्याचे कुटुंबीय आले होते. अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांची बहिण तसेच प्राप्ती रेडकरची आजी असे प्रत्येकाच्या जवळची माणसं इथे आली होती. दरम्यान, या सोहळ्यामध्ये देवमाणूस फेम अभिनेता किरण गायकवाडची आई देखील उपस्थित होती. त्यावेळी त्यांनी किरण गायकवाडचा एक मजेशीर किस्सा शेअर केला.
यंदा किरण गायकवाडने झी मराठी २०२५ चा सर्वोत्कृष्ट खलनायकाच्या पुरस्कारावर नाव कोरलं. त्यादरम्यान, किरणच्या आईने मालिकांमधील त्याचं खलनायकाचं पात्र पाहून काही महिलांना त्यांच्याकडे तक्रार केली होती. तो किस्सा सांगताना त्या म्हणाल्या, "लागिर झालं मालिका सुरु झाली होती तेव्हा बायका मला खूप शिव्या द्यायच्या. त्या म्हणायच्या किरणची आई तु्म्ही तुमच्या मुलाला कसलं वळण लावलं आहे? तुमचा मुलगा बायकांना मारतो. त्यामुळे मी त्याला घरातच घेतलं नाही. तुझी भीती वाटते असं सांगितलं. मग मी किरणला म्हणाले होते, 'तू असं काम का करतो? 'मी तुझ्यावर असे संस्कार केले आहेत का? तू असं काम नको करू असं मी त्याला सांगितलं होतं. त्यावर तो म्हणाला, अगं आई मी तसं काही करत नाही. मला मालिकेत त्या पद्धतीचं काम दिलं आहे. " पुढे त्या म्हणाल्या , जेव्हा मला किरणची आई म्हणून ओळखतात तेव्हा मला खूप भारी वाटतं.
शिवाय स्वप्नपूर्तीच्या मंचावर किरणच्या आईने अण्णा नाईक अर्थात अभिनेते माधव अभ्यंकर यांच्यासोबत काम करणाची इच्छा व्यक्त केली. त्यांचा हा साधेपणा अनेकांना भावला आहे.