"...अन् मी लावेन कूकर"; लग्नानंतर अभिषेक - सोनालीने एकमेकांसाठी घेतला खास उखाणा, व्हिडीओ बघाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 13:20 IST2024-11-29T13:19:06+5:302024-11-29T13:20:48+5:30
लग्नानंतर अभिनेता अभिषेक गावकर अन् सोनालीने एकमेकांसाठी घेतला भन्नाट उखाणा. व्हिडीओ व्हायरल

"...अन् मी लावेन कूकर"; लग्नानंतर अभिषेक - सोनालीने एकमेकांसाठी घेतला खास उखाणा, व्हिडीओ बघाच
नुकतंच मराठी अभिनेता अभिषेक गावकर आणि रील स्टार सोनाली गुरव या दोघांनी एकमेकांशी थाटामाटात लग्न केलं. कोकणातील निसर्गरम्य वातावरणात या दोघांनी एकमेकांसोबत लग्नगाठ बांधली. लग्नानंतर सोनालीला घेऊन अभिषेक त्याच्या गावच्या घरी कुटुंबियांसोबत धमाल करताना दिसला. त्यावेळी सोनाली-अभिषेकने एकमेकांसाठी घेतलेल्या उखाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. दोघांनी एकमेकांसाठी घेतलेला उखाणा ऐकून सर्वांनाच हसू फुटलं.
सोनाली - अभिषेकचा एकमेकांसाठीचा उखाणा
लग्नानंतर घरी आल्यावर अभिषेकचे कुटुंबिय सोनाली-अभिषेकला उखाणा म्हणण्याचा आग्रह करताना दिसतात. त्यावेळी पहिल्यांदा सोनाली म्हणते की, "मंगळसूत्र असतं सौभाग्याची खूण, अभिषेकचं नाव घेते गावकरांची सून". पुढे अभिषेक सोनाली उखाणा घेतो की, "आमचा संसार तेव्हाच होईल सुकर जेव्हा वामिका कापेल भाजी अन् मी लावेन कुकर". अभिषेकचा उखाणा ऐकताच सोनाली आणि सर्वजण हसताना दिसतात.
लग्नानंतर सोनालीने नाव बदललं?
अभिषेकने उखाणा घेताना वामिका असं नाव घेतलं. त्यामुळे लग्नानंतर सोनालीने नाव बदललं असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अभिषेक आणि सोनालीने मंगळवारी(२६ नोव्हेंबर) लग्नाच्या बेडीत अडकून नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. पारंपरिक पद्धतीने त्यांचा विवाहसोहळा पार पडला. कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत त्यांनी सात फेरे घेतले. अभिषेकने अनेक मालिकांमध्ये काम केलं असून सोनाली ही प्रसिद्ध रील स्टार असून तिचे ३ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.