"अध्यात्माचं काय झालं?" ममता कुलकर्णी २५ वर्षांनंतर टीव्हीवर; व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 11:43 IST2026-03-13T11:42:54+5:302026-03-13T11:43:58+5:30
तब्बल दोन दशकांहून अधिक काळ सिनेसृष्टीपासून दूर राहिल्यानंतर ममता पुन्हा टीव्हीवर परतल्याचं दिसलं आहे.

"अध्यात्माचं काय झालं?" ममता कुलकर्णी २५ वर्षांनंतर टीव्हीवर; व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले
९० च्या दशकात आपल्या सौंदर्याने प्रेक्षकांना घायाळ करणारी अभिनेत्री ममता कुलकर्णी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तब्बल दोन दशकांहून अधिक काळ सिनेसृष्टीपासून दूर राहिल्यानंतर ममता पुन्हा टीव्हीवर परतल्याचं दिसलं आहे. कलर्स टीव्हीवरील लोकप्रिय कुकिंग-कॉमेडी रिअॅलिटी शो 'लाफ्टर शेफ्स'मध्ये ममता पोहचली. मात्र, तिच्या या एन्ट्रीमुळे सोशल मीडियावर कौतुकासोबतच प्रश्नांची सरबत्तीही सुरू झाली आहे.
कलर्स टीव्हीनं इन्स्टाग्रामवर कार्यक्रमाचा प्रोमो शेअर केला आहे. ज्यात ममता ही अभिनेता कृष्णा अभिषेकच्या कपाळावर टिळा लावताना दिसत आहे, तर कृष्णा तिच्यावर गुलाल उधळताना दिसतोय. २५ वर्षांनंतर ममताला टीव्हीवर पाहून चाहते थक्क झाले आहेत. काही काळापुर्वी ममताने आपण अध्यात्म स्वीकारल्याचे आणि बॉलिवूडशी संबंध तोडल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे आता तिला टीव्ही शोमध्ये पाहून काही नेटकरी संतापल्याचं दिसलं. तर काहींनी तिला पुन्हा पडद्यावर पाहून आनंद झाल्याचं म्हटलं.
२५ वर्षांनंतर ममता कुलकर्णी परतली भारतात
जानेवारी २०२५ मध्ये प्रयागराज महाकुंभादरम्यान ममता कुलकर्णीला किन्नर आखाड्याची 'महामंडलेश्वर' बनवण्यात आले होते. मात्र, तिचे हे पद फार काळ टिकले नाही. शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांच्यावर केलेल्या एका वादग्रस्त टिप्पणीमुळे तिला या पदावरून हटवण्यात आले. अभिनयातून संन्यास घेण्यापूर्वी, ममता कुलकर्णी शेवटची २००२ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'कभी तुम कभी हम' या चित्रपटात रुपेरी पडद्यावर दिसली होती. एकेकाळी भारतीय चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा असलेल्या ममता कुलकर्णीने २००० कोटींच्या अंमली पदार्थांच्या तस्करीमध्ये तिचा कथित सहभाग आणि ड्रग माफिया विकी गोस्वामीसोबत लग्नाच्या अफवांनंतर देश सोडला होता. या प्रकरणातून तिची सुटका झाल्यानंतर ती २५ वर्षांनंतर २०२४ च्या शेवटी भारतात परतली.