माझा करार संपलाय..., महेश मांजरेकरांचा खुलासा; आता कोण होस्ट करणार ‘बिग बॉस मराठी’?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 17:48 IST2022-02-01T17:47:37+5:302022-02-01T17:48:13+5:30

Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’चा तिसरा सीझन नुकताच संपला आणि आता प्रेक्षकांना चौथ्या सीझनची प्रतीक्षा आहे. पण हा सीझन महेश मांजरेकर होस्ट करणार की नाही, याबद्दल सध्या तरी काहीही सांगता यायच नाही...

Mahesh Manjrekar contract with bigg boss marathi has ended who will host the new season | माझा करार संपलाय..., महेश मांजरेकरांचा खुलासा; आता कोण होस्ट करणार ‘बिग बॉस मराठी’?

माझा करार संपलाय..., महेश मांजरेकरांचा खुलासा; आता कोण होस्ट करणार ‘बिग बॉस मराठी’?

बिग बॉस मराठी’ (Bigg Boss Marathi )म्हटल्यानंतर एकच चेहरा डोळ्यांपुढे येतो. तो म्हणजे महेश मांजरेकर  ( Mahesh Manjrekar) यांचा. आत्तापर्यंत ‘बिग बॉस मराठी’चे तीन सीझन झालेत. हे तिन्ही सीझन हिट होण्यामागे स्पर्धकांचा हात आहेच, पण त्याहीपेक्षा जास्त मांजरेकरांना हात आहे. होय, दर शनिवारी-रविवारी  केवळ मांजरेकरांसाठी ‘बिग बॉस मराठी’ पाहणारे असंख्य प्रेक्षक आहेत. ‘बिग बॉस मराठी’चा तिसरा सीझन नुकताच संपला आणि आता प्रेक्षकांना चौथ्या सीझनची प्रतीक्षा आहे. पण हा सीझन महेश मांजरेकर होस्ट करणार की नाही, याबद्दल मात्र सध्या तरी काहीही सांगता यायच नाही. कारण ‘बिग बॉस मराठी’सोबतचा त्यांचा तीन वर्षांचा करार संपला आहे.

होय, पिपिंगमूनला दिलेल्या मुलाखतीत खुद्द मांजरेकरांनी हा खुलासा केलाये. ‘बिग बॉस मराठी’चे तिन्ही सीझन करताना मला खूप मज्जा आली. पण आता  माझा तीन वर्षांचा करार संपला आहे.  माझा होस्ट करण्याचा तीन वर्षांचा कॉन्ट्रॅक्ट होता आणि आता तो आता संपला आहे, असं त्यांनी सांगितलं. आता हा शो कोण होस्ट करतय ते बघुयात. म्हणजे तुमच्या बरोबर मी पण हा कार्यक्रम बघीन, असं देखील ते  म्हणाले. 
अजून खूप लोकं आहेत चांगलं सूत्रसंचालन करणारी. मला पुन्हा बोलावलं तरी आनंद होईल आणि नाही बोलावलं तरी देखील आनंदच होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

अलीकडेच महेश मांजरेकर यांना मूत्राशयाच्या कर्करोगाने ग्रासले होते.शस्त्रक्रियेतून उठल्यानंतर काही दिवसांतच त्यांनी ‘बिग बॉस मराठी 3’चे प्रोमो शूट केले होते. याचा अनुभव त्यांनी सांगितला होता. ‘बिग बॉस मराठी 3चा पहिला प्रोमो शूट झाला, तो दिवस कदाचित मी कधीच विसरू शकणार नाही. प्रोमो शूट करताना मला असह्य वेदना होत होत्या. शरीरभर वेदना होत्या. शरीरात अनेक ठिकाणी नळ्या लावलेल्या होत्या. या नळ्या कॅमे-यात कुठेही दिसू नये, यासाठी नाही नाही प्रयत्न सुरू होते. पण शूट पूर्ण करायचंच ही एक जिद्द होती. मी अस्वस्थ होतो, वेदनांनी विव्हळत होतो. पण चेह-यावर हे काहीही न दिसू देता मी जिद्दीने शूटींग पूर्ण केलं, असं त्यांनी सांगितलं होतं.
 

Web Title: Mahesh Manjrekar contract with bigg boss marathi has ended who will host the new season