'अबोल प्रीतीची अजब कहाणी'मध्ये लव्ह ट्रॅंगल, अभिनेत्री सई कल्याणकरची एन्ट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2024 19:06 IST2024-01-31T19:06:37+5:302024-01-31T19:06:52+5:30
Sai Kalyankar : 'अबोल प्रीतीची अजब कहाणी' मालिकेत अभिनेत्री सई कल्याणकर जोजोची भूमिका साकारताना दिसणार आहे. तिच्या येण्याने मालिकेत वेगळीच रंगत येणार आहे.

'अबोल प्रीतीची अजब कहाणी'मध्ये लव्ह ट्रॅंगल, अभिनेत्री सई कल्याणकरची एन्ट्री
सोनी मराठी(Sony Marathi)वरील 'अबोल प्रीतीची अजब कहाणी' (Abol Pritichi Ajab Kahani) ही मालिका प्रेक्षकांमध्ये बरीच लोकप्रिय आहे. अजिंक्यने साकारलेला राजवीर सध्या मुलींच्या गळ्यातला ताईत बनला आहे. राजवीरसारखा मनमिळाऊ-समजूतदार प्रेमी आपल्यालाही लाभावा, ही समस्त मुलींची सुप्त इच्छा आहे. पण.. पण.. इतर मुलींची इच्छा पूर्ण होण्याआधी आपल्या भाऊसाहेब उर्फ मयूरीच्या हाती हा राजवीर लागतो की नाही, याची उत्सुकता सध्या शिगेला पोहोचली आहे. हे गुपित फार काळ ताणून न धरता आता मालिकेत जोजो या पात्राची एन्ट्री होणार आहे. जोजो ही राजवीरची लहानपणीची मैत्रीण. तिच्या येण्याने मयूरी आणि राजवीर यांच्यामध्ये दुरावा येणार का, हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे.
अभिनेत्री सई कल्याणकर ही जोजोची भूमिका साकारताना दिसणार आहे. तिच्या येण्याने मालिकेत वेगळीच रंगत येणार आहे. सई कल्याणकर या अभिनेत्रीने या आधी निरनिराळ्या भूमिकांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडलेली सई आता जोजो या व्यक्तिरेखेतून 'अबोल प्रीतीची अजब कहाणी' या मालिकेद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिच्या येण्याने मालिकेत एक वेगळेच वळण येणार आहे.
जोजो आपल्या प्रेमाच्या जाळ्यात राजवीरला अडकवू शकेल का? तिच्या येण्याने मयूरी आणि राजवीर एकमेकांपासून दुरावले जातील का? यानिमित्ताने पेरलेल्या या नव्या संकटाला राजवीर-मयूरी कसे सामोरे जातील. जोजोच्या जाळ्यात अडकून राजवीर तिच्या प्रेमात पडेल का? हे आपल्याला 'अबोल प्रीतीची अजब कहाणी' या मालिकेच्या महाएपिसोडमध्ये पाहता येईल. 'अबोल प्रीतीची अजब कहाणी', महाएपिसोड, रविवार रात्री ८ वाजता सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळेल.