झी मराठी चित्रगौरव २०२३ पुरस्कार सोहळ्यात अशोक सराफ यांना जीवनगौरव प्रदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2023 16:16 IST2023-03-21T16:12:11+5:302023-03-21T16:16:26+5:30
अनोख्या विनोदी शैलीच्या जोरावर तब्बल तीन दशकांपासून प्रेक्षकांना खळखळून हसवणा-या अशोक मामा यांनी अनेक सुपरहिट सिनेमांत काम केलं.

झी मराठी चित्रगौरव २०२३ पुरस्कार सोहळ्यात अशोक सराफ यांना जीवनगौरव प्रदान
अशोक सराफ (Ashok Saraf) हे मराठी चित्रपटसृृष्टीतील एक मोठं नाव. इतक्या वर्षांपासून अशोक सराफ सातत्यानं प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. अनोख्या विनोदी शैलीच्या जोरावर तब्बल तीन दशकांपासून प्रेक्षकांना खळखळून हसवणा-या अशोक मामा यांनी अनेक सुपरहिट सिनेमांत काम केलं. बॉलिवूडमध्येही त्यांनी काही सिनेमे केलेत. चित्रपटसृष्टीत मामा या नावानं ओळखल्या जाणारे अशोक सराफ केवळ एक संवेदनशील अभिनेते नाहीत तर तितकेच संवेदनशील व्यक्तीही आहेत. आजवर त्यांना अनेक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं आहे.
यंदाच्या झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात अशोक सराफ यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. अभिनेता सिद्धार्थ जाधवने आपल्या नृत्याविष्काराने अशोक मामांचा जीवन प्रवास उलगडत अनोखी मानवंदना दिली.
खळखळून हसवणारे आणि तेवढेच अंतर्मुख करणारे अशोक मामा. पन्नासच्या वर हिंदी सिनेमे, दोनशेच्या आसपास मराठी सिनेमे, पंधरा टीव्ही मालिका, पंचवीस नाटकं आणि पुरस्काराचं अर्धशतक. एवढा प्रचंड प्रवास आहे मामांचा. जो आजही तेवढ्याच ताकदीने चालू आहे. अभिनय शिकायला कुठल्या शाळेत जायची गरज नाही.
अशोक सराफ नावाचं विद्यापीठ आहे केवळ बघत राहिलो तरी खूप काही शिकण्यासारखं आहे. अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक असे नाव आहे जे आजही आदराने घेतले जाते. अनेक तरुण कलाकारांचे ते आदर्श आहेत. विनोदाचा बादशहा ते खलनायक आणि गंभीर भूमिकाही अशोक सराफ यांनी तितक्याच ताकतीने मनोरंजनाच्या पडद्यावर रंगवल्या आहे. अशोक सराफ यांनी नाटक, चित्रपट आणि मालिका अशा तिन्ही माध्यमात काम केले आहे.