'लाखात एक आमचा दादा'ने घेतला निरोप! ईशा संजय झाली भावुक; म्हणाली- "सेट खूप मिळतील पण घर नाही..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 11:55 IST2025-10-06T11:54:19+5:302025-10-06T11:55:19+5:30
Isha Sanjay : 'लाखात एक आमचा दादा'चा प्रवास नुकताच संपला आहे. या मालिकेतील 'राजश्री'ची भूमिका साकारणारी अभिनेत्री ईशा संजय हिने मालिकेचा शेवटचा भाग प्रसारीत झाल्यावर एक अत्यंत भावुक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

'लाखात एक आमचा दादा'ने घेतला निरोप! ईशा संजय झाली भावुक; म्हणाली- "सेट खूप मिळतील पण घर नाही..."
मराठी मालिका 'लाखात एक आमचा दादा'(Lakhat Ek Amcha Dada Serial)चा प्रवास नुकताच संपला आहे. या मालिकेतील 'राजश्री'ची भूमिका साकारणारी अभिनेत्री ईशा संजय (Isha Sanjay) हिने मालिकेचा शेवटचा भाग प्रसारीत झाल्यावर एक अत्यंत भावुक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. मालिकेच्या टीममधील सदस्य आणि सहकलाकारांबद्दल तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
ईशा संजयने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिलं की, मालिकेचा शेवटचा भाग शूट झाला आणि त्याच क्षणी माझ्यासाठी हा शो संपला, असं मी स्वतःला समजावलं. भावनिक असल्यामुळे गोष्टींपासून लवकरात लवकर दूर गेलं, की त्रास कमी होतो, असा एक 'गोड गैरसमज' माझा आहे. पण, ती म्हणाली की मी लांब पळायचा प्रयत्न केला तरी त्या गोष्टींचं अस्तित्व नष्ट होत नाही आणि त्या समोर येतातच. इतर मित्र-मैत्रिणींच्या स्टोरीज आणि पोस्ट्स वाचून परत ते दिवस आठवले आणि शेवटी डोळ्यात पाणी आलंच, मी पळू शकले नाही.
'राजूचा वाडा' हे ईशासाठी 'हक्काचं घर'
ईशाने मालिकेमुळे तिला ओळख, प्रेम, आत्मविश्वास आणि जिवाभावाचे मित्र मिळाल्याचं नमूद केलं. तिने स्पष्टपणे सांगितलं की, "'राजूचा वाडा' (सेट) हे ईशासाठी हक्काचं घर होतं. यामागचं कारण म्हणजे दिग्दर्शक किरण दळवी सर, शिवराज नांगरे पाटील आणि टीममधील सदस्य जसे की ऋद्धिष पाटील, सागर आव्हाड, शैलेश आणि मनीषा कदम. या सगळ्यांनी तिला सेटवर कधीही परकं वाटू दिलं नाही. घरापासून लांब असूनही दुसरं घर मिळालं होतं. इथून पुढे खूप सेट मिळतील पण घर नाही ही खात्री आहे!"
सहकलाकारांबद्दल विशेष प्रेम
तिने आपल्या सहकलाकारांवर विशेष प्रेम व्यक्त केलं आहे. तिने लिहिलं, "नितीश, जुई, कोमल, समृद्धी, महेश, स्वप्नील, अतुल, शुभम, तुम्ही मला खूप सहन केलंत आणि आयुष्यभर सहन करत राहाल अशी आशा करते. लव्ह यू गाइज" यासोबतच तिने झी मराठी आणि निर्मात्या श्वेता शिंदे व संजय खांबे यांचे संधी दिल्याबद्दल आभार मानले आहेत. ईशाने आपल्या चाहत्यांना 'असंच प्रेम असू द्या, भेटू नवीन भूमिकेत' असं सांगत पोस्टचा समारोप केला आहे.