क्रांती रेडकर आणि दीपा परब झळकणार एकत्र, दिसणार या मालिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 13:18 IST2025-11-14T13:17:16+5:302025-11-14T13:18:57+5:30
Kranti Redkar and Deepa Parab: मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकर आणि दीपा परब लवकरच छोट्या पडद्यावर काम करताना दिसणार आहे.

क्रांती रेडकर आणि दीपा परब झळकणार एकत्र, दिसणार या मालिकेत
मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकर आणि दीपा परब लवकरच छोट्या पडद्यावर काम करताना दिसणार आहे. त्या दोघी कलर्स मराठी वाहिनीवरील 'बाईपण जिंदाबाद' मालिकेतील एका कथेत काम करताना दिसणार आहेत. शर्ट या कथेत दीपा परब वसुधाच्या भूमिकेत दिसणार आहे तर क्रांती रेडकर मानसीच्या भूमिकेत पाहायला मिळेल.
कलर्स मराठीवरील 'बाईपण जिंदाबाद’ ही मालिका सुरुवातीपासूनच स्त्रीचा आयुष्याकडे पाहण्याचा वास्तववादी दृष्टिकोन सादर करते आहे. समाजातील स्त्रीत्वाच्या बदलणाऱ्या संकल्पना या मालिकेने सादर केल्या असून प्रत्येक वेळी नात्यांच्या, भावनांच्या आणि तिच्या मनातल्या द्वंद्वाच्या कथा सांगितल्या आहेत. या मालिकेत येणारी नवी कथा 'शर्ट' ही त्याच प्रवासातील एक संवेदनशील आणि मनाला भिडणारी कथा आहे. या कथेचं शीर्षक आणि त्यातून उलगडणारी कथा दोन स्त्रियांच्या जीवनातील अनोख्या नात्यांचा अकल्पित प्रवास मांडते.
एका अनपेक्षित भेटीतून सुरू होणारा हा प्रवास दुःख, अपराधीपणा आणि क्षमेच्या भावनेतून एका नव्या नात्याची बीजे रुजवतो. आजच्या स्त्रीची ही गोष्ट प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडेल. कधी डोळ्याच्या कडेला ओलावेल, तर कधी चेहऱ्यावर हास्य फुलवेल. कथेत वसुधाची व्यक्तिरेखा दीपा परब हिने साकारली असून मानसीच्या भूमिकेत आहे क्रांती रेडकर आहे. मराठीतील या दोन अभिनयसंपन्न सशक्त अभिनेत्री कथानकाच्या केंद्रस्थानी असून त्यांनी या कथेतील वसुधा आणि मानसी या व्यक्तिरेखा अक्षरशः जिवंत केल्या आहेत. वसुधाच्या आयुष्यात अचानक आलेल्या मानसीला एक शर्ट हवा आहे यापासून सुरू होणारी त्यांची गोष्ट नात्याच्या एका अकल्पित प्रवासाला जन्म देते. हा उलगडणारा संवेदनशील प्रवास फक्त नात्यांचा नाही; तो आहे स्वीकाराचा, क्षमेचा आणि आत्मभानातून उमलणाऱ्या बाईपणाचा. प्रत्येक स्त्रीला आपलीशी वाटणारी ही कथा बाईपण जिंदाबाद! शर्ट १६ नोव्हेंबर रात्री ८वाजता कलर्स मराठीवर पाहायला मिळेल.