Bus Bai Bus : आता खूप झालीत वळणं..., ‘बस बाई बस’च्या मंचावर किशोरी पेडणेकरांची तुफान फटकेबाजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2022 14:05 IST2022-08-26T14:02:22+5:302022-08-26T14:05:57+5:30
Bus Bai Bus : ‘बस बाई बस’चा प्रोमो रिलीज झाला आहे. या प्रोमोमध्ये किशोरी पेडणेकर ‘बस बाई बस’च्या मंचावर रोखठोक उत्तरं देताना दिसत आहेत.

Bus Bai Bus : आता खूप झालीत वळणं..., ‘बस बाई बस’च्या मंचावर किशोरी पेडणेकरांची तुफान फटकेबाजी
झी मराठी वाहिनीवरचा ‘बस बाई बस’ (Bus Bai Bus ) हा तुफान धम्माल कार्यक्रम. सध्या याच कार्यक्रमाची चर्चा आहे. होय, सुबोध भावेचं (Subodh Bhave )दमदार सूत्रसंचालन आणि वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवलेल्या महिलांची तुफान फटकेबाजी असा हा शो अल्पावधीत प्रेक्षकांचा आवडता शो बनला आहे. आत्तापर्यंत खासदार सुप्रिया सुळे, भाजपा नेत्या पंकजा मुंडे, अमृता फडणवीस अशा राजकीय पार्श्वभूमी असलेल्या दिग्गज महिलांनी या शोमध्ये हजेरी लावली. आता या शोच्या नव्या भागात शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. याचा प्रोमो नुकताच रिलीज झाला आहे. या प्रोमोमध्ये किशोरी पेडणेकर ‘बस बाई बस’च्या मंचावर रोखठोक उत्तरं देताना दिसत आहेत.
शिवसेनेला सत्तेत येण्यासाठी सोडून गेलेल्या आमदारांचं मन वळवावं लागेल का? असा प्रश्न सुबोध त्यांना विचारतो. यावर किशोरी पेडणेकर यांनी अगदी रोखठोक उत्तर दिलं. आम्ही त्या आमदारांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला. झाडाला जशी नवी पालवी फुटते तशी आमच्या शिवसेना पक्षालाही नव्याने पालवी फुटेल. आमचा बाळासाहेबांचा पक्ष जसा आहे आजही तसाच आहे. आम्हाला जिंकून देणारे लोक आजही आमच्याबरोबर आहेत, असं त्या म्हणाल्या. यावर सुबोध भावेनी त्यांना यालाच जोडून एक आणखी प्रश्न विचारला.
‘ पक्षाला नवीन पालवी जर फुटणार असेल तर जुन्या लोकांची मन वळवावी लागतील का? ’असं सुबोधने विचारलं. यावर,‘आता वळणं भरपूर झाली. आता ते वळणाच्या बाहेर गेले आहेत. पुन्हा ते शक्य नाही,’ असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.