प्राजक्ताच्या प्रेमात करण? घराबाहेर येताच 'त्या' व्हायरल व्हिडीओबद्दल म्हणाला "हो आम्ही हात पकडला"
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 12:10 IST2026-02-17T12:08:12+5:302026-02-17T12:10:29+5:30
'बिग बॉस'च्या घरात करण आणि गायिका प्राजक्ता शुक्रे यांची चांगली मैत्री पाहायला मिळाली होती. दोघांमध्ये प्रेम फुलत असल्याच्या चर्चाही प्रेक्षकांमध्ये सुरू झाल्या होत्या.

प्राजक्ताच्या प्रेमात करण? घराबाहेर येताच 'त्या' व्हायरल व्हिडीओबद्दल म्हणाला "हो आम्ही हात पकडला"
'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या आठवड्यात चाहत्यांना आणि घरातील सदस्यांनाही मोठा धक्का मिळाला आहे. भाऊच्या धक्क्यावर आयुष संजीव आणि करण सोनावणे या दोन सदस्यांनी बिग बॉसच्या घरातून एक्झिट घेतली. करण सोनावणे घरातील एक स्ट्राँग स्पर्धक होता. परंतु कमी मतं मिळाल्याने करण सोनावणेला 'बिग बॉस मराठी ६'मधून बाहेर जावं लागलं. 'बिग बॉस'च्या घरात करण आणि गायिका प्राजक्ता शुक्रे यांची चांगली मैत्री पाहायला मिळाली होती. दोघांमध्ये प्रेम फुलत असल्याच्या चर्चाही प्रेक्षकांमध्ये सुरू झाल्या होत्या. आता घराबाहेर आल्यावर करणनं प्राजक्ता शुक्रेसोबतच्या नात्यावर भाष्य केलं.
'बिग बॉस'च्या घरात करण आणि प्राजक्ता फळांच्या बोर्डच्या आड एकमेकांसोबत फ्लर्ट करताना दिसले होते. त्या व्हायरल प्रसंगावर स्पष्टीकरण देताना करण म्हणाला, "घरामध्ये आम्ही अगदी शाळेतल्या लहान मुलांसारखे मित्र होतो. भाऊच्या धक्क्यावर किंवा एरवी आम्हाला कंटाळा आला की आम्ही एकमेकांना मारायचो. त्या वेळी प्राजक्ताला झोप येत होती आणि मी तिची झोप उडवत होतो, म्हणून तिने हात माझ्याकडे केला होता. तुम्हाला दाखवलं काय जातंय आणि तुम्ही त्यावर कसे गंडताय, हे पाहून मला हसायला येतं. हो आम्ही हात पकडला. पण, मस्तीमध्ये पकडला होता. ते नाही दाखवलं आणि हे टास्कमधील दाखवलं".
करण पुढे म्हणाला, "सगळं गणित एडिट टेबलवर फिरलं आहे. त्यांना (मेकर्सना) आम्हाला कपल म्हणून दाखवायचं होतं आणि तसंच दाखवलं गेलं. बाहेर आल्यानंतर मला या गोष्टी कळाल्या. लोकांना जे पाहिजे तेच विचार करून दाखवलं जातं. मला या गोष्टीची अडचण नाही, पण जर प्राजक्ताला अडचण असेल, तर ती बाहेर आल्यावर त्याबद्दल बोलेल".
प्राजक्तासोबतच्या कनेक्शनबद्दल बोलताना करण म्हणाला, "आम्ही दोघेही खरे आहोत, पण ती जास्त भावनिक आहे. घरात लोक तिचा फायदा घेत होते आणि त्याचा तिला त्रास होत होता. ते पाहून मलाही खूप त्रास व्हायचा. पण हा 'बिग बॉस'चा गेम असल्यामुळे मी तिला काही सांगू शकत नव्हतो. जसा आई-वडिलांना त्रास झाल्यावर आपल्याला होतो, तसंच काहीसं कनेक्शन माझं तिच्यासोबत झालं होतं". आपल्या स्वभावाबद्दल बोलताना तो म्हणाला की, "माझाही अनेकांनी गैरफायदा घेतला आहे, म्हणूनच मी माझी भावनिक बाजू सहजासहजी कोणाला दाखवत नाही".