"ए भाई भाषा सांभाळ...", देवीच्या गाण्यावर शिवीगाळ करणाऱ्याला जुईने सुनावलं, रोहित म्हणाला- "देवांच्या मिरवणुकीत दारू पिऊन..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 12:57 IST2025-09-26T12:55:48+5:302025-09-26T12:57:54+5:30
रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांचंही “आई अंबाबाई” हे गोंधळाचं गाणं नवरात्रीत प्रेक्षकांच्या भेटीला आलं. मात्र एका चाहत्याने यावर अतिशय अश्लील भाषेत शिवीगाळ करत कमेंट केली होती. या चाहत्याचा जुईली आणि रोहितने चांगलाच समाचार घेतला आहे.

"ए भाई भाषा सांभाळ...", देवीच्या गाण्यावर शिवीगाळ करणाऱ्याला जुईने सुनावलं, रोहित म्हणाला- "देवांच्या मिरवणुकीत दारू पिऊन..."
सध्या नवरात्रोत्सवामुळे सगळीकडे वातावरण अगदी मंगलमय आणि प्रसन्न वाटत आहे. नवरात्रीच्या निमित्तान देवीचा जागर आणि गोंधळ अशी अनेक नवी गाणी प्रेक्षकांच्या भेटीस आली आहेत. रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांचंही “आई अंबाबाई” हे गोंधळाचं गाणं नवरात्रीत प्रेक्षकांच्या भेटीला आलं. या गाण्याला चांगला प्रतिसादही मिळाला. मात्र एका चाहत्याने यावर अतिशय अश्लील भाषेत शिवीगाळ करत कमेंट केली होती. या चाहत्याचा जुईली आणि रोहितने चांगलाच समाचार घेतला आहे.
या चाहत्याने आक्षेपार्ह कमेंट करत असं म्हटलं की "सगळे XXX भरती झालेत गाण्यांमध्ये, देवाच्या गाण्याचा मजाक बनवून ठेवला तुम्ही XXX". चाहत्याने शिवीगाळ केल्याने भडकलेल्या जुईलीने त्याला चांगलंच सुनावलं आहे. "अय्य भाई! भाषा सांभाळ! तुला नाही बघायचंय तर नको बघू, स्क्रोल डाऊन कर. तुला जे काही बोलायचंय ना ते पर्सनली मेसेज करून पण बोलू शकतोस. इथे भक्तीने, श्रद्धेने काम केलंय. तुमच्यासारखे नल्ले लोक इथे आई अंबाबाईच्या गाण्यावर शिव्या घालत असतील तर ते चालणार नाही. आम्ही आमचं काम कष्ट करून आणि मजा घेऊन करतो. नाचू वाटलं तर नाचतो कारण ते आम्ही क्रिएट केलंय. आम्ही ते गाणं तुमच्यापर्यंत पोहोचवतोय यातही खूप कष्ट आहेत. तुम्हाला तोंडाला काहीही येईल ते बोलण्यासाठी इथे अंगण दिलेलं नाहीये. काम नसतील तर काम कर, आईचा आशीर्वाद मिळेल. तेव्हाच कलेची कदर करशील. आम्ही कलाकार आहोत. आई सरस्वतीचा हात आहे आमच्यावर, ही असली थिल्लरगिरी दुसरीकडे जाऊन कर भावा! इथे नाही!", असं जुईने म्हटलं.
अश्लील शब्दात कमेंट करणाऱ्या या युजरचा रोहित राऊतनेही चांगलाच समाचार घेतला. "अरे वाह आज तुझ्या आईला काय आनंद झाला असेल नाही, की कसा माझा मुलगा मस्त आईवरची शिवी घालतोय इन्स्टाग्रामवर. तेही देवीच्या गाण्यावरच. कसं आहे मित्रा तू आणि तुझ्यासारखे लोक ना, सगळ्या देवांच्या मिरवणुकीत घाणेरडी गाणी लाऊन दारू पिऊन त्यावर नाचता, त्यामुळे एकदा स्वतःला बघावं आणि मग ठोकाव्यात कॉमेंटी लोकांच्या पोस्टवर. आम्ही कलाकार लोक आमची गाणी बनवताना पूर्णपणे समर्पित होऊन, मज्जा घेत काम करतो, कारण तुम्हाला मज्जा यावी. पण तुम्हाला जर एखादी गोष्ट आवडत नसेल तर पुढे जा... बघू नका, खेचून कोणीही आणत नाही तुम्हाला! राहिला विषय तुझ्या भाषेचा, तर ती सुधार आणि नसेल सुधारणार तर एकदा स्वत:च्या आईसमोर जाऊन हे बोलून बघ काय म्हणते ती! जिचा उत्सव चालू आहे तिची तरी लाज ठेव", असं म्हणत रोहितनेही त्या युजरला सुनावलं आहे.
“आई अंबाबाई” हे गाणं रोहित राऊतने लिहिलं आणि संगीतबद्ध केलं आहे. तर जुईलीने ते गाणं गायलं आहे. अभिनेत्री मिताली मयेकर आणि लावणी नृत्यकार आशिष पाटील यांनी या गाण्यात नृत्य सादर केलं आहे.