'ठरलं तर मग' मालिकेत पूर्णा आजीची भूमिका कोण साकारणार? जुई गडकरीनं दिलं अपडेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 13:13 IST2025-09-04T13:13:26+5:302025-09-04T13:13:55+5:30
'ठरलं तर मग' मालिकेत पूर्णा आजीची भूमिका कोण साकारणार, यावर जुई गडकरीनं प्रतिक्रिया दिली आहे.

'ठरलं तर मग' मालिकेत पूर्णा आजीची भूमिका कोण साकारणार? जुई गडकरीनं दिलं अपडेट
गेल्या काही दिवसांपासून 'ठरलं तर मग' या लोकप्रिय मालिकेच्या चाहत्यांमध्ये एकच चर्चा सुरू आहे. ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्या निधनानंतर आता मालिकेत पूर्णा आजीची भूमिका कोण साकारणार, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. आता याबद्दल मालिकेतील मुख्य अभिनेत्री जुई गडकरी हिने प्रतिक्रिया दिली आहे.
'ठरलं तर मग' या मालिकेतील पूर्णा आजीची भूमिका साकारणाऱ्या ज्योती चांदेकर यांचे १६ ऑगस्ट रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने मालिकेतील कलाकारांना आणि प्रेक्षकांना मोठा धक्का बसला. गेल्या अडीच वर्षांपासून त्या ही भूमिका साकारत होत्या. त्यांच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले होते. त्यामुळे आता ज्योती चांदेकर यांच्या जागी कोण येणार, याबद्दल चाहते 'ठरलं तर मग'मधील कलाकारांना विचारताना दिसून येत आहेत.
नुकतंच जुई गडकरीनं 'आस्क मी सेशन' घेतलं. यावेळी तिला चाहत्यांनी 'पूर्णा आजीच्या भूमिकेसाठी नवीन कोण येणार?' असा प्रश्न विचारला. यावर पूर्णा आजीच्या भूमिकेबद्दल सांगताना जुई म्हणाली, "मला अनेक लोक याबद्दल प्रश्न विचारत आहेत. आम्ही सगळेच त्यांना (ज्योती चांदेकर) खूप मिस करत आहोत. पण त्यांच्या भूमिकेसाठी नवीन कोण येणार, हे आम्हालासुद्धा माहिती नाहीये. हे सगळे निर्णय चॅनेल घेणार आहे".
जुईने पुढे सांगितले, "या निर्णयाबद्दल चॅनेलने अधिकृत माहिती दिल्याशिवाय कोणीही युट्यूब, इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर येणाऱ्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका" याआधी मालिकेत अर्जून ही भुमिका साकारणारा अमित भानुशालीनेही हा अंतिम निर्णय चॅनेल आणि निर्माते घेतील, असे सांगितले होते.
याशिवाय जुईला एका चाहत्यानं विचारलं की "तू बनवलेला कोणता पदार्थ पूर्णा आजींना खूप जास्त आवडायचा?". यावर उत्तर देत जुई म्हणाली, "अलिकडेच त्यांच्यासाठी मी आळूचं फदफद केलं होतं. त्यांना ते खूप आवडलं होतं", असं जुईनं सांगितलं.