सुयश टिळक आणि आयुषी भावे यांच्यात बिनसलं? अभिनेत्याच्या 'त्या' पोस्टमुळे चर्चेला उधाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 09:52 IST2025-07-09T09:51:46+5:302025-07-09T09:52:10+5:30
Suyash Tilak and Ayushi Bhave : अभिनेता सुयश टिळक सध्या चर्चेत आला आहे. त्याने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमधून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या पोस्टनंतर तो आणि त्याची पत्नी आयुषी भावे यांच्या खासगी आयुष्यात काहीतरी बिनसल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

सुयश टिळक आणि आयुषी भावे यांच्यात बिनसलं? अभिनेत्याच्या 'त्या' पोस्टमुळे चर्चेला उधाण
मराठी कलाविश्वातील अभिनेता सुयश टिळक (Suyash Tilak) सध्या चर्चेत आला आहे. त्याने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमधून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या पोस्टनंतर तो आणि त्याची पत्नी आयुषी भावे (Aayushi Bhave) यांच्या खासगी आयुष्यात काहीतरी बिनसल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यांच्या नात्यात दुरावा आल्याचे म्हटले जात आहे.
अभिनेता सुयश टिळक सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय आहे. तो सोशल मीडियावर त्याचे आगामी प्रोजेक्ट, निसर्ग संवर्धन आणि वाइल्ड लाइफ फोटोग्राफीच्या विविध पोस्ट शेअर करत असतो. मात्र ८ जुलैला त्याने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टनंतर त्याचे खासगी आयुष्य चर्चेत आले. यात त्याने त्याचा एक फोटो शेअर केला आणि त्याने वापरलेल्या ऑडिओने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यात म्हटलंय की, ''हा फोटो मी सिंगल असतानाचा आहे...'' यानंतर काही वेळासाठी काहीच ऐकू येत नाही, मग थोड्यावेळाने पुन्हा आवाज येतो की, ''हाहाहाहा.... कशाची वाट पाहताय? मी अजूनही सिंगलच आहे.'' या ऑडिओनंतर त्याचे आणि आयुषीच्या नात्यात दुरावा आला आहे का, असा सवाल नेटकऱ्यांना पडला आहे.
सुयश टिळक आणि आयुषी भावेने २१ ऑक्टोबर, २०२१ रोजी लग्नगाठ बांधली होती. आणि त्याच वर्षी ७ जुलैला साखरपुडा केला होता. त्यांचे दोन्ही समारंभाचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. त्यानंतर ते दोघे एकमेकांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत प्रेम व्यक्त करत होते. परंतु लग्नानंतर काही वर्षांनी त्यांच्या नात्यात काहीतरी बिनसल्याची चर्चा रंगली आहे. कारण त्यांनी सोशल मीडियावरील एकमेकांसोबतचे लग्नासोबत सर्व फोटोही हटवले आहेत. त्यामुळे ते दोघे वेगळे झाल्याचे बोलले जात आहे. मात्र सुयश किंवा आयुषीने ते वेगळे झाले किंवा घटस्फोट झाल्याची अधिकृत माहिती दिलेली नाही