'इंद्रायणी' मालिका रंजक वळणावर, इंद्रायणी उधळणार श्रीकलाचे कपटी डाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 19:50 IST2025-11-26T19:49:47+5:302025-11-26T19:50:13+5:30
'Indrayani' serial : 'इंद्रायणी' मालिकेत सध्या श्रीकला आणि इंद्रायणी यांच्यात रंगणारा संघर्ष प्रेक्षकांसाठी मोठं आकर्षण ठरत आहे.

'इंद्रायणी' मालिका रंजक वळणावर, इंद्रायणी उधळणार श्रीकलाचे कपटी डाव
कलर्स मराठीवरील 'इंद्रायणी' मालिकेत सध्या श्रीकला आणि इंद्रायणी यांच्यात रंगणारा संघर्ष प्रेक्षकांसाठी मोठं आकर्षण ठरत आहे. महाएपिसोडपासून सुरू झालेल्या या ड्रामात श्रीकला इंद्रायणीला त्रास देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसणार आहे. मात्र, इंद्रायणी तिच्या प्रत्येक डावाला हुशारीने हाणून पाडते, तिचे कटकारस्थान फोल ठरवते.
श्रीकला आता दिग्रसकरांच्या घरावर ताबा मिळवण्यासाठी वेगळाच गेम खेळते. व्यंकू महाराज, गोपाळ, घरातील संपत्ती, दागिने या सर्वांवर तिची नजर आहे. श्रीकलाचे कपटी डाव आणि इंद्रायणी त्यांना कसे उधळते, हे या आठवड्यात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. श्रीकला यात वेगळाच डाव टाकणार आणि इंद्रायणी घराची राखणदार म्हणून तिला पुरून उरणार आहे. हे सगळे मालिकेत सुरु असतानाच ऑफस्क्रीन देखील कलाकारांची धम्माल मस्ती सुरु असते. आता हिवाळ्याला सुरुवात झाली आहे आणि बरीच थंडी देखील पसरली आहे. इंद्रायणी मालिकेचे शूट आउटडोअर देखील सुरु असतं त्यामुळे कलाकार स्वतःची विशेष काळजी घेतात.
इंद्रायणी अर्थात कांची शिंदे म्हणाली, "इंद्रायणी मालिकेचे शूट नाशिकला सुरु आहे. हिवाळा सुरु झाला आहे, इथे प्रचंड थंडी आहे. जिथे आमच्या मालिकेचा सेट आहे, तिथे पूर्ण विठूची वाडी हे गावं उभारलं आहे, तिथे आजूबाजूला शेत आहे, हिरवळ आहे आणि त्यामुळेच इथे खूप थंड असतं. शहरात किती थंडी आहे मला माहिती नाहीये. पण आमचा सेट शहराच्या बाहेर आहे त्यामुळे इथे चांगलचं गार असतं. अक्षरशः बोबडी वळते पण तरीदेखील सगळं युनिट अगदी वेळेत सेटवर असतं, शूट वेळेत सुरु होतं. दुपार झाली की, जरा कमी होते थंडी नाहीतर सीनमध्ये सुद्धा दात कायम वाजत असतात इतकं गार असतं."
"सगळ्यात मोठा टास्क असतो रात्रीचे शूटिंग..."
ती पुढे म्हणाली की, "मला हिवाळा खूपचं आवडतो. सगळ्यात मोठा टास्क असतो रात्रीचे शूटिंग... ते करणं कठीण असतं. एक सिन होता जिथे दाखवलं इंदू शेतात बसली आहे, राखण करायला... तिला भीती असते श्रीकला शेत जाळेल. तेव्हा शेकोटी लावण्यात आली, आम्ही डान्स केला थोडी एनर्जी यावी म्हणून. आम्ही धम्माल केली त्या सीनला. सेटवर सगळेच एकमेकांची काळजी घेतात. इंद्रायणी मालिकेचे बरेच शूट आउटडोअर असल्याने प्रॉडक्शन हाउस आणि वाहिनीने निर्णय घेतला की प्रत्येक पात्राला स्वेटर घालू द्या ज्यांचे आउटडोअर सीन असतील. या निर्णयामुळे आम्हां सगळ्यांनाच भारी वाटलं."