लोकप्रिय मराठी अभिनेत्यानं मालिका संपताच शेती करण्याचा घेतला निर्णय; म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 09:47 IST2026-04-06T09:43:25+5:302026-04-06T09:47:40+5:30
मराठीतले अनेक कलाकार सिनेविश्वात यशस्वी झाल्यानंतरही आपल्या मातीला अन् शेतीला विसरलेले नाहीत.

लोकप्रिय मराठी अभिनेत्यानं मालिका संपताच शेती करण्याचा घेतला निर्णय; म्हणाला...
Nishant Pawar Starts Farming : मराठी मनोरंजन विश्वातील कलाकार केवळ चंदेरी दुनियेतच नाही, तर आपल्या मातीशीही घट्ट जोडलेले असतात. सयाजी शिंदे, नाना पाटेकर यांसारख्या दिग्गजांनंतर आता एका तरुण अभिनेत्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून कलर्स मराठीवरील 'इंद्रायणी' मालिकेत 'अधोक्षज'ची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेला अभिनेता निशांत पवार (Nishant Pawar) आहे.
निशांत पवार आता थेट शेतात दिसला आहे. गेल्या दोन वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या 'इंद्रायणी' मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. मालिका संपल्यानंतर निशांत थेट आपल्या गावी पोहचला. सोशल मीडियावर शेतातील फोटो शेअर करत त्याने लिहिले, "मालिका संपली, शेती चालू. माझं म्हणजेच आपलं वावर. बेसिकपासून सुरुवात करत आहे". निशांतने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तो कधी ट्रॅक्टर चालवताना, तर कधी गाई-गुरांसोबत वेळ घालवताना दिसत आहे.
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच निशांतने एक नवीन कोरी कार खरेदी केली होती. ज्याचे फोटो त्याने चाहत्यांसोबत शेअर केले होते. निशांत पवार हा केवळ अभिनयापुरताच मर्यादित नाही, तर सोशल मीडियावरही तो मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. तो सतत आपल्या चाहत्यांसोबत वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील खास क्षण शेअर करत असतो. दरम्यान, निशांतची मुख्य भूमिका असलेल्या 'इंद्रायणी' या मालिकेने जवळपास २ वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर निरोप घेतला. मालिका संपल्यानंतर आता निशांत पुन्हा कोणत्या नवीन भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.