Indian Idol 12: टीआरपीचा खेळ मांडला, एकानंतर एक खोट्या ड्रामेबाजीचा असा झाला पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 05:36 PM2021-05-14T17:36:08+5:302021-05-14T17:36:38+5:30

'इंडियन आयडॉल १२' सुरुवातीपासूनच अनेक कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

Indian Idol 12: TRP's game played, one fake drama after another exposed | Indian Idol 12: टीआरपीचा खेळ मांडला, एकानंतर एक खोट्या ड्रामेबाजीचा असा झाला पर्दाफाश

Indian Idol 12: टीआरपीचा खेळ मांडला, एकानंतर एक खोट्या ड्रामेबाजीचा असा झाला पर्दाफाश

googlenewsNext

'इंडियन आयडॉल'चा बारावा सीझन सातत्याने वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येतो आहे. एकानंतर एक खोट्या गोष्टींचा पर्दाफाश झाल्याचे पहायला मिळाले. हे सर्व काही नाटक टीआरपीसाठी चालू असल्याचे बोलले जात आहे. मात्र याबद्दल प्रेक्षक सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करताना दिसतात. 

इंडियन आयडॉलच्या सुरुवातीला परीक्षक नेहा कक्कर आणि आदित्य नारायण यांच्या लग्नाची तयारी दाखवण्यात आली होती. इतकेच नाही तर या दोघांच्या कुटुंबातील सदस्य एकमेकांना भेटले देखील होते. पण त्यांचे लग्न होऊ शकले नाही. मात्र, काही दिवसांनंतर हे सगळे टीआरपीसाठी करण्यात आल्याचे समोर आले होते. त्यानंतर सोशल मीडियावर खूपच ट्रोल केले होते.

काही दिवसांपूर्वी सुप्रसिद्ध गीतकार संतोष आनंद यांनी ‘इंडियन आयडॉल’मध्ये हजेरी लावली होती. यावेळी संतोष आनंद यांना पाहून केवळ ‘इंडियन आयडॉल’च्या सेटवरचेच नाही तर त्यांना टीव्हीवर पाहणारे प्रेक्षकही भावूक झाले होते. ‘इंडियन आयडॉल १२’च्या सेटवर आलेल्या संतोष आनंद यांनी त्यांची सध्याची परिस्थिती आणि मुलगा व सुनेबद्दल सांगितले. त्यांनी सांगितेली कर्मकहाणी ऐकून प्रत्येकाचे डोळे पाणावले. यादरम्यान नेहा कक्करने संतोष आनंद यांना 5 लाख रूपयांची मदत देऊ केली. तुमची नात समजून हे पैसे घ्या, असे नेहा संतोष आनंद यांना म्हणाली. पण नेटकर्‍यांना कदाचित हे रूचले नाही. टीआरपीसाठी मेकर्सनी गरिबीची थट्टा केल्याचा आरोप अनेक नेटकऱ्यांनी केला.


इंडियन आयडॉलचा स्पर्धक सवाई भट हा खूप गरीब घरात असल्याचे दाखवले होते. सवाईच्या घरचे लोक कठपुतळ्या तयार करण्याचे काम करतात, मात्र त्यातून त्यांची फार कमाई होत नाही, असा दावा केला होता. मात्र सवाईचे जे फोटे सोशल मीडियावर व्हायरल झाले. ते पाहून तो इतका ही गरीब घरातला नसल्याचे समोर आले. त्यानंतर सोशल मीडियावर निर्मात्यांना आणि सवाईलाही युझर्सनी खूप ट्रोल केले.


तसेच काही दिवसांपूर्वी सवाई भटने शो सोडून जायचे आहे आणि आईसोबत रहायचे असल्याचे म्हटले होते. शोचे परीक्षक हिमेश रेशमिया आणि विशाल दादलानी त्याला समजवतात आणि तो शो सोडून न जाण्याचा निर्धार करतो. शोच्या टीआरपीसाठी मेकर्सनी सवाई भटच्या गरिबीचा पुन्हा एकदा वापर केला. लोकांनी शोमध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट स्क्रिप्टेड असल्याचे सांगितले आहे.


सायली कांबळेचा एका व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत ती सुरेश वाडकर यांच्यासोबत गाताना दिसत आहे. या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. सायलीने इंडियन आयडॉल या कार्यक्रमात सांगितले होते की, ती एका चाळीत राहाते आणि तिच्या घरात टिव्ही देखील नाहीये. तसेच तिचे वडील रुग्णवाहिका चालक आहेत. सायलीने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत इथपर्यंत मजली मारली, यामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत होते. पण सुरेश वाडकर यांच्यासारख्या दिग्गजांसोबत ती स्टेज परफॉर्मन्स देताना व्हिडिओ व्हायरल झाल्याने ती तिच्या परिस्थितीबाबत खोटे बोलत होती अशी सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.


नुकताच इंडियन आयडॉलमध्ये किशोर कुमार यांचा स्पेशल एपिसोड होता. नेहा कक्कर आणि हिमेश रेशमिया यांना किशोर कुमार यांची गाणी गायली आणि लोकांनी या दोन्ही जजेसला ट्रोल करणे सुरू केले. इतके कमी की काय म्हणून या एपिसोडमध्ये स्पेशल गेस्ट बनून आलेले किशोर कुमार यांचे पुत्र अमित कुमार यांनीही ‘इंडियन आयडल १२’ पोलखोल केली. शूट सुरु होण्यापूर्वीच मला स्पर्धकांचे कौतुक करायचे आहे, असे सांगण्यात आले आणि मी तेच केले, असे सांगत अमित कुमार यांनी सर्वांना धक्का दिला.

 

Web Title: Indian Idol 12: TRP's game played, one fake drama after another exposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.