"मला एवढं धस्स झालं होत त्या दिवशी...", श्रेया बुगडेची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2024 17:00 IST2024-06-22T17:00:14+5:302024-06-22T17:00:55+5:30

Shreya Bugde : चला हवा येऊ द्याची कॉमेडी क्वीन श्रेया बुगडे पुन्हा झी मराठीवरील ड्रामा ज्युनिअर्स या कार्यक्रमात ती सूत्रसंचालन करताना दिसणार आहे.

"I was so shocked that day...", Shreya Bugde's post is in discussion | "मला एवढं धस्स झालं होत त्या दिवशी...", श्रेया बुगडेची पोस्ट चर्चेत

"मला एवढं धस्स झालं होत त्या दिवशी...", श्रेया बुगडेची पोस्ट चर्चेत

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम 'चला हवा येऊ द्या'(Chala Hawa Yeu Dya)ने अलिकडेच प्रेक्षकांचा निरोप घेतला. या कार्यक्रमाने निरोप घेतल्यानंतर आता यातील कलाकार आता इतरत्र विखुरले आहेत. प्रत्येक जण हिंदी-मराठी रिअॅलिटी शोमध्ये दिसून येत आहेत. यामध्येच चला हवा येऊ द्याची कॉमेडी क्वीन श्रेया बुगडे (Shreya Bugde) पुन्हा झी मराठीवर पाहायला मिळणार आहे. एका नव्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ती प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. या कार्यक्रमाचं नाव आहे ड्रामा ज्युनिअर्स. या कार्यक्रमात ती सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. नुकतेच श्रेयाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. जी चर्चेत आली आहे. 

श्रेया बुगडे हिने ड्रामा ज्युनिअर्स शोच्या मंचावरील फोटो शेअर करत लिहिले की, खरेतर २७ वर्षापूर्वी मी “बालकलाकार” म्हणून ह्या मनोरंजन क्षेत्रात आले आणि इथेच रमले. साधारण २१ वर्षापूर्वी ‘तुझ्याविना' ह्या मालिकेच्या निमित्ताने मी झी परिवारात सामील झाले आणि टीव्हीचा उंबरठा ओलांडून तुमच्या घरात आले, तेव्हापासूनच आपलं नातं. नातं आपुलकीचं , प्रेमाचं आणि जबाबदारीचं… होय जबाबदारीचं सुद्धा… कारण सांगते ! एकदा प्रेक्षकातल्या एक काकू सहज बोलता-बोलता म्हणाल्या “मला जर मुलगी झाली ना तर तिचं नाव मी ‘श्रेयाच’ ठेवेन. तुझ्या सारखीच होऊदे पोर माझी” मला एवढं “धस्स” झालं होत त्या दिवशी, बापरे!

ती पुढे म्हणाली की, पुढे त्या काकूंना “श्रेया” झाली का “श्रेयस” ते काही मला कळलं नाही पण माझी मात्र जबाबदारी वाढली कारण अश्याच काही काकू, काका, दादा, ताईंची चिमुरडी घेऊन पुन्हा एकदा टीव्हीचा उंबरठा ओलांडून मी तुमच्या घरी येतेय! ! आजपासून सुरु होणाऱ्या ‘ड्रामा जुनिअरस ‘ ह्या शो चं सूत्रसंचालन मी करणार आहे. ...पुन्हा एक नवीन प्रवास सुरु करणार आहे. झी मराठी आणि मी आमच्या ह्या जोडीला तुम्ही कायम खूप प्रेम आणि यश दिलत, ह्या नवीन प्रवासात आमच्या सोबत जोडलेल्या सगळ्यांना पण तसंच भरभरून प्रेम द्याल ह्याची खात्री आहे. आज पासून आम्ही येतोय आमच्या गँग सोबत.... भेटू मग आज आणि उद्या रात्री 9-10वाजता. ड्रामा जुनिअर्स. शनिवार -रविवार रात्री ९ -१0 वाजता. तुमच्या माझ्या नात्याची विण आणखी घट्ट होऊदे !

Web Title: "I was so shocked that day...", Shreya Bugde's post is in discussion