"असह्य वेदना अन्...", कर्करोगाबद्दल बोलताना हिना खान झाली भावुक, म्हणाली- "तो काळ माझ्यासाठी..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 18:59 IST2025-12-26T18:57:06+5:302025-12-26T18:59:49+5:30
हिना खानने सांगितला कर्करोगादरम्यानचा कठीण काळ, म्हणाली...

"असह्य वेदना अन्...", कर्करोगाबद्दल बोलताना हिना खान झाली भावुक, म्हणाली- "तो काळ माझ्यासाठी..."
Hina Khan: लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री हिना खान सातत्याने चर्चेत असते. अभिनेत्रीला गेल्याच वर्षी हिनाला ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं होतं. कर्करोगाच्या तिसऱ्या टप्प्यात ती होती. ज्यामुळे तिचं आयुष्यच पूर्णपणे बदलून गेलं.अलिकडेच तिच्याव शस्त्रक्रिया झाली असून ती तिच्या आरोग्याची चांगली काळजी घेते आहे.आता तिची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली आहे. ती इतरांना प्रेरणा देत राहते. अलिकडेच, अभिनेत्रीने कर्करोगाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
किमोथेरपीदरम्यान हिनाला अनेक शारीरिक आणि भावनिक आव्हानांना सामोरं जावं लागलं. तिच्यासाठी तो काळ खूप कठीण होता. या सगळ्याचा सामना करणं खूप अवघड होतं. नुकत्याच सोहा अली खानच्या पॉडकास्टमध्ये दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने तिच्या आजारपणावर भाष्य केलं आहे. दरम्यान, हिना म्हणाली, "तो काळ माझ्यासाठी खूप कठीण होता. माझ्या आयुष्यातील ते दिवस मी कधीही विसरू शकत नाही. त्यावेळी, प्रत्येक रुग्णाला उपचारांदरम्यान एक आठवड्याचा ब्रेक दिला जातो. पहिल्या आणि दुसऱ्या केमोथेरपी दरम्यान हा ब्रेक घेणं आवश्यक आहे. काहींसाठी तर हा ब्रेक तीन आठवड्यांचा असतो, आणि माझ्या बाबतीतही तसंच होतं. तीन आठवड्यानंतर माझी दुसरी किमोथेरपी झाली."
पुढे ती म्हणाली,"या उपचारादरम्यान, रुग्णाला असेही काही अनुभव येतात. ज्याचा त्याने आयुष्यात कधीच विचार केला नसेल.शरीरात अधूनमधून वेदना होतात आणि बरं होण्याची प्रक्रिया खूपच संथ होते. या काळात मला दर तीन आठवड्यांनी केमोथेरपी घ्यावी लागत होती. पहिला आठवडा माझ्यासाठी खूप कठीण होता. खूप वेदना होत होत्या. माझ्या नसांमधील वेदना सर्वात जास्त होत्या. त्यानंतर, किमोथेरपीनंतरचे दोन आठवडे माझ्यासाठी चांगले जायचे."
हिना या सगळ्याला मोठ्या धीराने सामोरी गेली. ते दिवस आठवत अभिनेत्री या मुलाखतीत भावुक झाल्याची पाहायला मिळाली. ती म्हणाली, "त्या काळात मी स्वतःसोबत वेळ घालवला. मी प्रवास केला आणि मला जे काही करायचं होतं ते सर्व केलं.मी ठरवलं की, उरलेले दिवस आनंदात घालवायचे. मी माझ्या मनात याबद्दल विचार केला, तेव्हा मी अनेक गोष्टी आणि खूप वेदना सहन करू शकले. त्यामुळे उपचारादरम्यानही मी अनेक गोष्टींचा सामना करू शकले."असा खुलासा अभिनेत्रीने केला.