पैशांसाठी वॉचमनची नोकरी; एका मालिकेनं पालटलं नशीब, आज आहे कोट्यवधींचा मालक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 15:40 IST2026-02-22T15:38:25+5:302026-02-22T15:40:33+5:30
वॉचमनची नोकरी ते टीव्हीचा सुपरस्टार! अभिनेत्याचा 'झिरो टू हिरो' प्रवास

पैशांसाठी वॉचमनची नोकरी; एका मालिकेनं पालटलं नशीब, आज आहे कोट्यवधींचा मालक!
बॉलिवूडमध्ये दरवर्षी अनेक जण हिरो होण्याचं स्वप्न घेऊन येतात. पण यश फक्त जिद्द असणाऱ्यांनाच मिळतं. टीव्ही आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता गुरमीत चौधरी आज आलिशान आयुष्य जगतोय. तो कोटींच्या संपत्तीचा मालक आहे. पण, इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्याने केलेला संघर्ष काळजाला भिडणारा आहे. अभिनेता होण्यापूर्वी गुरमीतने मुंबईत वॉचमनची नोकरी केली होती.
लष्करी कुटुंबात जन्मलेल्या गुरमीतला लहानपणापासूनच अभिनयाची ओढ होती. त्याने मॉडेलिंगपासून सुरुवात केली आणि 'मिस्टर जबलपूर'चा किताबही पटकावला. मात्र, मुंबईत आल्यावर उदरनिर्वाहासाठी त्याला कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले. एका मुलाखतीत त्याने सांगितले की, पैसे कमवण्यासाठी त्याने दक्षिण मुंबईतील कुलाब्यात एका दुकानात वॉचमन म्हणून नोकरी केली होती.
गुरमीतला खरी ओळख मिळाली ती टीव्हीवरील 'रामायण' मालिकेतील रामाच्या भूमिकेमुळे. या मालिकेने त्याला घराघरात पोहोचवलं. मात्र, रामायणानंतरही त्याचा संघर्ष संपला नाही. जेव्हा त्याने चित्रपटात जाण्याचा विचार केला, तेव्हा अनेकांनी त्याला टोमणे मारले. "लोक तुला टीव्हीवर मोफत पाहतात, मग तुझे चित्रपट पाहण्यासाठी पैसे का खर्च करतील?" असे प्रश्न त्याला विचारले गेले. मात्र, त्याने हार मानली नाही आणि चित्रपटांतही आपली छाप पाडली.