फ्रेश चेहरा, हिट फॉर्म्युला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2016 08:31 IST2016-07-30T04:12:35+5:302016-07-30T08:31:53+5:30
मालिकांमध्ये प्रसिद्ध चेहरे घेऊन मालिका हिट करण्याचा फंडा सध्या मोडीत काढला जातोय. हिट चेहऱ्यांऐवजी नवीन चेहऱ्यांना संधी दिली जातेय. नव्या चेहऱ्यांना घेऊन येणाऱ्या मालिका

फ्रेश चेहरा, हिट फॉर्म्युला
मालिकांमध्ये प्रसिद्ध चेहरे घेऊन मालिका हिट करण्याचा फंडा सध्या मोडीत काढला जातोय. हिट चेहऱ्यांऐवजी नवीन चेहऱ्यांना संधी दिली जातेय. नव्या चेहऱ्यांना घेऊन येणाऱ्या मालिका चांगल्याच हिट ठरतायत. त्यामुळे नवीन येणाऱ्या मालिकांमध्ये मुख्य भूमिका करणारा अभिनेता किंवा अभिनेत्री हे फ्रेश चेहरे असल्याचे चित्र पाहायला मिळतेय.
सध्या तरुणांमध्ये शिव हा प्रसिद्ध झालाय. ‘काहे दिया परदेस’ मालिकेत शिव म्हणजे ऋषी सक्सेना हा प्रमुख भूमिकेत असून, त्याची नायिका म्हणजेच गौरीची भूमिका सायली संजीव साकारतेय. शिव आणि गौरीची जोडी सध्या रसिकांची वाहवा मिळवतेय. याआधी ऋषी सक्सेनाने काही हिंदी मालिकांमध्ये छोट्या भूमिका केल्या होत्या. सायली संजीवनेही काही सिनेमा आणि जाहिरातींमध्ये काम केलेय.
नुकतीच सुरू झालेली मालिका ‘खुलता कळी खुलेना’मध्ये ओमप्रकाश शिंदे आणि मयूरी देशमुख हे दोघेही प्रमुख भूमिकेत आहेत. ओमप्रकाशने याआधी ‘का रे दुरावा’ मालिकेत सहकलाकाराची भूमिका साकारलीय. मात्र, तो खऱ्या अर्थाने नावारूपाला आलाय ते ‘खुलता कळी खुलेना’ मालिकेतूनच. नुकतची ही मालिका रसिकांच्या भेटीला आली असली, तरी ओमप्रकाश-मयूरी दोघेही रसिकांना भावतायत... ‘जय मल्हार’ मालिकेतील देवदत्त नागेनं मराठी मनावर गारुड केलंय. याआधी ‘वीर शिवाजी’मध्ये त्यानं तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारली. त्यानंतर ‘लागी तुझसे लगन, देवयानी’ या मालिकांत भैया विखे-पाटीलची भूमिका केली. मात्र, लहानांपासून प्रौढांपर्यंत साऱ्यांवर देवदत्त नागेनं साकारलेल्या ‘जय मल्हार’मधील भूमिकेनं मोहिनी घातलीय.
ऋतुजा बागवे हिनंही स्वानंदी बनून ‘नांदा सौख्य भरे’ मालिकेतून छोट्या पडद्यावर एंट्री घेतली त्यालाही रसिकांची भरभरून पसंती मिळालीय. दिल-दोस्ती म्हणत ‘दुनियादारी’ मालिकेत तर काही फ्रेश चेहरे होते. सखी गोखले, अमेय वाघ, पूजा ठोंबरे, पुष्कराज चिरपुटकर, सुव्रत जोशी, स्वानंदी टिकेकर आणि पंकज कामकर यांना रसिकांचं भरभरून प्रेम मिळालं. या नवोदित कलाकारांच्या अभिनयाला आणि मालिकेला बरीच लोकप्रियता मिळाली. अमेय वाघनं मराठी सिनेमा जरी केला असला, तरी त्यालाही ‘दिल-दोस्ती-दुनियादारी’ मालिकेनंच प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. या मालिकेमुळेच हे सगळे कलाकार ओळखले जातात.
जुई गडकरीनं ‘बाजीराव मस्तानी’मध्ये चंदा ही भूमिका साकारली होती, तर ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ मालिकेमध्ये सोनियाची भूमिका साकारली. तिच्या या भूमिका रसिकांना भावल्या. याशिवाय ‘तुझं विण सख्या रे’मध्ये लावण्या आणि आता ‘पुढचं पाऊल’मध्ये कल्याणीची भूमिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरतेय. एकूणच काय, तर प्रसिद्ध चेहऱ्यांऐवजी फ्रेश आणि नवे चेहरे रसिकांना आवडत असल्याचं यानिमित्तानं समोर आलंय.
- suvarna.jain@lokmat.com