झी मराठीवरील ही मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, त्याजागी सुबोध भावेचा नवीन शो येणार भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 19:09 IST2022-07-06T19:08:48+5:302022-07-06T19:09:24+5:30

Subodh Bhave: येत्या २९ जुलै पासून सुबोध भावे प्रेक्षकांना छोट्या पडद्यावर काम करताना दिसणार आहे.

Farewell to the audience who will take this series on Zee Marathi, Subodh Bhave's new show will come | झी मराठीवरील ही मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, त्याजागी सुबोध भावेचा नवीन शो येणार भेटीला

झी मराठीवरील ही मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, त्याजागी सुबोध भावेचा नवीन शो येणार भेटीला

झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील 'बँड बाजा वरात' (Band Baja Varat) हा शो लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. सुरुवातीला या शोमध्ये रेणुका शहाणे आणि पुष्कराज चिरपुटकर परीक्षक आणि सूत्रसंचालकाच्या भूमिकेत पाहायला मिळाले. आता हा शो प्रेक्षकांचा निरोप घेणार असून त्याजागी प्रेक्षकांना नवीन शो पाहायला मिळणार आहे. या नवीन शोमध्ये अभिनेता सुबोध भावे सूत्रसंचालन करताना दिसणार आहे.

लग्नापूर्वी जोडप्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आमंत्रित करून वेगवेगळे टास्क देण्यात येत होते, या दोन स्पर्धकांमध्ये रंगलेली चुरस प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. विजेत्या जोडीला बक्षीस म्हणून पैठणी आणि मणीमंगळसूत्र देऊन सन्मानित करण्यात येत होते. मात्र त्यानंतर या शोमध्ये मृण्मयी देशपांडे ही सुत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळू लागली. अशोक सराफ, भारत गणेशपुरे, किशोरी शहाणे यांच्यासह किरीट सोमय्या सारख्या राजकारण्यांना देखील आमंत्रित करून त्यांची लग्न लावून देण्यात आली. मात्र आता हा शो लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याचे समोर आले आहे. येत्या २९ जुलै पासून शुक्रवार आणि शनिवारी रात्री ९.३० वाजता ‘बस बाई बस’ हा नवीन रिएलिटी शो झी मराठी वाहिनीवर दाखल होत आहे. या शोचे सूत्रसंचालन सुबोध भावे करताना दिसणार आहे.

महिलांसाठी राखीव बस आयोजित करून बसमध्ये बसलेल्या महिलांना सुबोध भावे बोलते करताना दिसणार आहे. सहभागी झालेल्या महिला वर्गाला वेगवेगळे टास्क देऊन त्यातून उडणारी धमालमस्ती प्रेक्षकांचे निश्चितच मनोरंजन करेल अशी आशा आहे. या शोमधून आणखी एक नवी संकल्पना मांडण्याचा प्रयत्न झी मराठी वाहिनीने केला आहे. येत्या काही काळातच हा शो नेमका कशावर आधारित असेल या गोष्टीचा लवकरच उलगडा होईल. सुबोध भावे या शोचे सूत्रसंचालन करणार असल्याने त्याच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. तुला पाहते रे या मालिकेनंतर सुबोध पुन्हा एकदा झी मराठी वाहिनीवर झळकणार आहे. सुबोध भावेचे सूत्रसंचालन प्रेक्षकांनी पाहिले आहे त्यामुळे त्याच्या या नव्या शोची उत्सुकता अधिक वाढली आहे. 

Web Title: Farewell to the audience who will take this series on Zee Marathi, Subodh Bhave's new show will come