Exclusive: 'रंग माझा वेगळा' मालिकेत या अभिनेत्रीचं कमबॅक, शूटिंगला केली सुरूवात
By तेजल गावडे | Updated: May 23, 2022 15:04 IST2022-05-23T15:03:52+5:302022-05-23T15:04:41+5:30
Rang Maza Vegla: 'रंग माझा वेगळा' ही मालिका रंजक वळणावर आली असून आता या मालिकेत एका अभिनेत्रीनं कमबॅक केल्याचं समजते आहे.

Exclusive: 'रंग माझा वेगळा' मालिकेत या अभिनेत्रीचं कमबॅक, शूटिंगला केली सुरूवात
स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'रंग माझा वेगळा' (Rang Maza Vegla)ने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. सध्या ही मालिका रंजक वळणावर आली आहे. मालिकेत दीपिका, कार्तिकी आणि सौंदर्या दीपा आणि कार्तिकला एकत्र आणण्याचा प्रयत्न करत असतात. तर दुसरीकडे आयशा आणि श्वेताची कारस्थानं सुरू असतात. कार्तिकने दीपिकाला खोटं सांगून एका महिलेचा फोटो दाखवून तिची आई असल्याचे सांगितले होते. तसेच ती देवाघरी गेल्याचंही तो सांगतो. त्यानंतर ती बाई खरोखर आता इनामदारांच्या बंगल्यात राहायला आली असून ती दीपिकाला तिची आई असल्याचे सांगते. त्यामुळे आता हा तिढा कसा सोडायचा असा प्रश्न कार्तिक आणि सौंदर्याला पडला आहे. दरम्यान आता या मालिकेत या अभिनेत्रीनं कमबॅक केले आहे. ही अभिनेत्री म्हणजे अश्विनीची भूमिका साकारणारी वैशाली राहुल भोसले (Vaishali Rahul Bhosale). तिने नुकतेच मालिकेच्या शूटिंगला सुरूवात केल्याचेही समजते आहे.
रंग माझा वेगळा मालिकेत दीपा ज्या घरात राहते आहे ती तिची मैत्रिण अश्विनी नवऱ्याला भेटण्यासाठी दुबईत जाते असे दाखवले होते. त्यानंतर अश्विनी दुबईवरून परत आलेली दाखवली नाही. मात्र आता पुन्हा मालिकेत अश्विनीची एन्ट्री होणार आहे. खरेतर वैशाली भोसले प्रेग्नेंट राहिल्यामुळे तिला ही मालिका सोडावी लागल्याचे वृत्त समोर आले होते. त्यानंतर काही दिवसांनी मिसकॅरेज झाल्याचे तिने सांगितले होते. मात्र आता पुन्हा तिने या मालिकेत कमबॅक केले आहे. तसेच ती पुन्हा अश्विनीची भूमिका साकारण्यासाठी खूपच उत्सुक आहे.
वैशालीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर तिने मालिका व नाटक या माध्यमात आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला आहे. रंग माझा वेगळाशिवाय तिने बऱ्याच मालिकेत काम केले आहे. लक्ष्य, बंध रेशमाचे, तू माझा सांगाती आणि चंद्र आहे साक्षीला या मालिकेत ती झळकली आहे.
याशिवाय मिलिंद शिंदे लिखित दिग्दर्शित नाच तुझंच लगिन हाय या चित्रपटातही तिने काम केले. तसेच आगामी रमेश मोरे लिखित आणि दिग्दर्शित टॉपर या सीरिजमध्येही ती झळकली आहे.