विशेष लेख: 'तो' एक क्षण आणि दिव्या शिंदेचा संयम सुटला; 'सरकार' नेमकी चुकली कुठे?
By देवेंद्र जाधव | Updated: February 8, 2026 10:44 IST2026-02-08T10:41:48+5:302026-02-08T10:44:46+5:30
'बिग बॉस; या शोमध्ये भांडण तंटे होताना दिसतात. पण फार क्वचितच ही भांडणं वेगळ्या पातळीवर जातात आणि स्पर्धकांचा तोल जातो. याआधीही 'बिग बॉस'मध्ये विशेषतः 'बिग बॉस मराठी'मध्ये अशा घटना घडल्या आहेत. परंतु दिव्याचं जाणं हे सर्वांना विचार करायला लावणारं आहे.

विशेष लेख: 'तो' एक क्षण आणि दिव्या शिंदेचा संयम सुटला; 'सरकार' नेमकी चुकली कुठे?
बिग बॉस या शोमध्ये भांडण तंटे होताना दिसतात. पण फार क्वचितच ही भांडणं वेगळ्या पातळीवर जातात आणि स्पर्धकांचा तोल जातो. याआधीही 'बिग बॉस'मध्ये विशेषतः 'बिग बॉस मराठी'मध्ये अशा घटना घडल्या आहेत.
दुसऱ्या सीझनमध्ये पराग कान्हेरेची हकालपट्टी असो, पाचव्या सीझनमध्ये आर्या जाधवला घराबाहेर काढणं असो की नुकत्याच सुरु असलेल्या सीझनमध्ये दिव्या शिंदे घराबाहेर जाणं असो... रागाच्या भरात प्रत्येक सदस्याला 'त्या' एका क्षणावर मात करता आली नाही, आणि त्यांना बाहेरचा रस्ता धरावा लागला. दिव्या शिंदेच्या बाबतीतही तेच झालं.
काय घडलं होतं नेमकं?
एकमेकांच्या चेहऱ्यावर लाल रंगाची फुली मारुन टास्क खेळायचा होता. सुरुवातीपासून अशा टास्कमध्ये दिव्याला टार्गेट केलं जात होतं, असं ती सांगत आली आहे. त्यामुळे या वेळीही असंच काहीसं झालं होतं. त्यामुळे दिव्या आधीच चिडलेली असणार हे उघड होतं. अशातच जेव्हा तन्वीने दिव्या बाहेरच्या गोष्टी बोलते, तिला रात्री झोप लागत नाही, सकाळी मग ती तब्येतीची कारणं देते, हे ऐकल्यावर दिव्याचा पारा आणखी चढला.
तरीही तिने शांतपणे तन्वीला उत्तरं देण्याचा प्रयत्न केला. मुळात कळत नकळतपणे दिव्या बाहेरच्या गोष्टी सदस्यांशी शेअर करत असेलही. पण त्याचा मुद्दा असा उपस्थित होईल, याची तिला कल्पना नव्हती. तन्वीला उत्तरं देताना दिव्या प्रत्येक शब्दावर जोर देऊन बोलत होती. हे इतर सदस्यांना खटकत होतं. तरीही बिग बॉसने यात हस्तक्षेप केला नाही.
त्यानंतर दिव्याला जेव्हा टास्क खेळण्यासाठी बोलावण्यात आलं तेव्हा तिच्या मनात धुसफुस सुरु होती. ती तिने बाहेर काढली. यावेळी बोलता बोलता ती बाहेर जशी भाषणं करते, तसा तिचा सूर लागला. त्यामुळेच तलवार चालवणं, जीवे मारण्याची धमकी देणं असे शब्द तिच्या तोंडातून बाहेर पडले. दिव्या एवढी सज्ञान आहे की तिला आपण काय बोलतोय, हे कळत असावं. आणि त्या क्षणी होत्याचं नव्हतं झालं...
तो एक क्षण आणि दिव्याचा संयम सुटला
तलवारीची भाषा करताना रुचिताने दिव्याला विचारलं की, ''तू धमकी देत आहेस?'' त्यावेळी दिव्या जर शांत बसली असती तर प्रकरण पुढे चिघळलं नसतं. ''हो ही धमकीच आहे!'', असं ती वारंवार म्हणत राहिली. तिने शब्दांचा अर्थ थोडा फिरवला असता तर प्रकरण सौम्य झालं असतं. पुढे बिग बॉसने दिव्या-राकेशला कन्फेशन रुममध्ये बोलावलं. तेव्हाही बिग बॉस आणि राकेशने तिला शांतपणे समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु दिव्या ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती. ती तिच्या म्हणण्यावर ठाम होती.
इथपर्यंतही ठीक होतं. परंतु कन्फेशन रुममधून बाहेर आल्यावर दिव्या राकेशला म्हणाली, ''मी माफी मागणार नाही.'' इथेच सर्व डाव फिस्कटला. दिव्याने एकदा शांतपणे बिग बॉस आणि घरातल्यांची माफी मागली असती तर तिला असं तडकाफडकी बाहेर पडावं लागलं नसतं. सचिन, राकेशदादासाठी इमोशनल असलेली दिव्या या महत्वाच्या क्षणी रुक्ष, कठोर झाली होती. शेवटपर्यंत तिला तिच्या बोलण्याचा कोणताही पश्चाताप नव्हता. परिणामी, तिला घराबाहेर जावं लागलं.
दिव्या शिंदे खेळात कुठेतरी मागे होती परंतु तिने काही मोजक्या लोकांशी चांगलं नातं जपलं होतं. त्यामुळेच ती खेळात टिकून होती आणि तिची दखल घेतली जात होती. परंतु रागाच्या त्या एका क्षणी संयम न जपता दिव्याने काहीसा बेफिकीरपणा दाखवला अन् तिचा 'बिग बॉस मराठी ६'च्या घरातील प्रवास संपला.