नव्या रूपात, नव्या दिमाखात 'दामिनी' पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 17:54 IST2025-10-11T17:53:47+5:302025-10-11T17:54:22+5:30
Damini 2.0 Serial : 'सत्यता शोधण्या, घेऊनी लेखणी, जाहली दामिनी, मूर्त सौदामिनी' हे गाणं घराघरांत वाजलं की, घरातला प्रत्येक जण दूरदर्शनच्या छोट्या पडद्यासमोर हजर व्हायचा आणि 'दामिनी' या मालिकेमध्ये गुंतून जायचा. आता तीस वर्षांनी या मालिकेचा दुसरा सीझन त्याच वाहिनीवरून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

नव्या रूपात, नव्या दिमाखात 'दामिनी' पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला
'सत्यता शोधण्या, घेऊनी लेखणी, जाहली दामिनी, मूर्त सौदामिनी' हे गाणं घराघरांत वाजलं की, घरातला प्रत्येक जण दूरदर्शनच्या छोट्या पडद्यासमोर हजर व्हायचा आणि 'दामिनी' या मालिकेमध्ये गुंतून जायचा. 'दामिनी' ही मालिका दूरदर्शनच्या छोट्या पडद्यावर सुरू झाली, तेव्हा तिने एक इतिहास घडवला. प्रतीक्षा लोणकर, क्षिती जोग या अभिनेत्रींनी आधी या मालिकेत मुख्य व्यक्तिरेखा साकारल्या. सुबोध भावे आणि क्षिती जोग यांची या मालिकेतील जोडीही गाजली. आता तीस वर्षांनी, या मालिकेचा दुसरा सीझन नव्या रूपात, नव्या दिमाखात पुन्हा त्याच वाहिनीवरून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'दामिनी २' मध्ये किरण पावसे ही साताऱ्याची अभिनेत्री मुख्य व्यक्तिरेखा साकारणार आहे. तिच्यासह पुण्याचा ध्रुव दातार हा अभिनेता नायकाच्या भूमिकेत आहे. येत्या १३ ऑक्टोबरपासून, सायं ७.३० वाजता 'दामिनी २.०' ही मालिका सह्याद्री वाहिनीवर सुरू होणार आहे. ही दामिनी आता नव्या रूपात, नव्या उत्साहात दाखल होणार असली, तरी तिची प्रेरणा, ऊर्जा आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द तीच आहे. आपल्या आजीचा वारसा घेऊनच ही दामिनीही पत्रकारितेच्या नव्या क्षेत्रात लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी सज्ज झाली आहे.
ध्रुव दातार हा अभिनेता या मालिकेतून नायकाच्या भूमिकेत झळकत आहे. नव्या दमाच्या कलाकारांबरोबरच आधीच्या 'दामिनी' मालिकेतील सुबोध भावे आणि क्षिती जोग, हे कलाकारही या मालिकेतून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. आधीच्या मालिकेवर प्रेक्षकांनी जसं प्रेम केलं, तसंच या मालिकेवरही करतील, असा विश्वास सगळ्यांना आहे. मूळ संकल्पना स्व. गौतम अधिकारी, मार्कंड अधिकारी यांची आहे. कांचन अधिकारी यांनी कथा, पटकथा लेखन आणि मालिका दिग्दर्शन केले आहे. विठ्ठल डाकवे हे एपिसोड दिग्दर्शक आहेत. कथाविस्तार आणि संवादलेखन अभिजित पेंढारकर यांचे आहे. मुंबई दूरदर्शनने मालिकेची निर्मिती केली आहे.