चला हवा येऊ द्या! CHYD चं नवं शीर्षक गीत रिलीज; कॉमेडीच्या गँगवॉरची झलक बघा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 14:12 IST2025-07-16T14:11:08+5:302025-07-16T14:12:17+5:30
Chala Hawa Yeu Dya: श्रेया अक्का, कुश्या भाई, भारत दादा, डॉन प्रियदर्शन आणि गौरव राज यांच्यात रंगलंय गँगवॉर!

चला हवा येऊ द्या! CHYD चं नवं शीर्षक गीत रिलीज; कॉमेडीच्या गँगवॉरची झलक बघा
Chala Hawa Yeu Dya Title Song: २०१४ ते २०२४ ही दहा वर्ष ज्या कार्यक्रमाने सर्वांना खळखळून हसवलं तो म्हणजे 'चला हवा येऊ द्या'. हाच कार्यक्रम आता नव्या फॉर्मॅटमध्ये येतोय. श्रेया बुगडे, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे हे जुने कलाकार आहेत. तर प्रियदर्शन जाधव, गौरव मोरे यांची नव्याने एन्ट्री झाली आहे. तसंच निलेश साबळेंच्या जागी अभिजीत खांडकेकर सूत्रसंचालन करणार आहे. 'चला हवा येऊ द्या'च्या शीर्षक गीताचीही तेव्हा हवा होती. आता नव्या फॉर्मॅटचं नवं शीर्षक गीत रिलीज झालं आहे.
'चला हवा येऊ द्या'चं नवं शीर्षक गीत फारच मनोरंजक आहे. यंदा कॉमेडीचं गँगवॉर चालणार आहे. श्रेया अक्का, कुश्या भाई, भारत दादा, डॉन प्रियदर्शन आणि गौरव राज यांच्यात स्पर्धा असल्याचं प्रोमो मध्ये दिसून आलं. कॉमेडीचा डॉन कोण होणार यावरुन ही स्पर्धा आहे. या पाचही जणांचा यामध्ये निराळा लूक आहे आणि ते गाण्यावर डान्स करत आहेत. प्रत्येकासोबत अभिजीत खांडकेकर डान्स करताना दिसत आहे. हे शीर्षक गीत सोशल मीडियावर चांगलंच गाजत आहे.
'चला हवा येऊ द्या:कॉमेडीचं गँगवॉर' २६ जुलैपासून झी मराठीवर सुरु होत आहे. शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता कार्यक्रम प्रसारित होणार आहे. कमेंट्समध्ये अनेकांनी भाऊ आणि निलेश साबळेंची आठवण काढली आहे. तर गौरव मोरे आणि प्रियदर्शनला पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. यावेळी शोमध्ये सामान्यांनाही संधी मिळाली आहे. शोमध्ये येऊन कॉमेडी करण्यासाठी त्यांची ऑडिशनही घेतली गेली. 'चला हवा येऊ द्या'च्या या नवीन पर्वाचा नेमका फॉर्मॅट काय असणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.