खुशीयों का दिन आया है..., कुशल बद्रिकेचा हा भन्नाट VIDEO बघून तुम्हाला हसू आवरणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 18:02 IST2022-05-03T17:58:46+5:302022-05-03T18:02:23+5:30
Kushal Badrike VIDEO : ‘बातमी खूप लोकांना कळू नये म्हणून फक्त तुमच्या पुरतीच ठेवा आणि काही झालं तरी तिच्यापर्यंत पोहाचवू नका,’ असं हा व्हिडीओ शेअर करताना कुशलनं लिहिलं आहे.

खुशीयों का दिन आया है..., कुशल बद्रिकेचा हा भन्नाट VIDEO बघून तुम्हाला हसू आवरणार नाही
‘चला हवा येऊ द्या’चा (Chala Hawa Yeu Dya) विनोदवीर कुशल बद्रिके (Kushal Badrike) सोशल मीडियावरही प्रचंड अॅक्टिव्ह आहे. इन्स्टावरचे त्याचे भन्नाट व्हिडीओ पाहून हसू आवरत नाही. सध्या त्याच्या एका अशाच व्हिडीओनं धम्माल केली आहे. आता कुशलनं एक गुडन्यूज शेअर केली आहे. ही गुडन्यूज कळली तरी कुशल आनंदानं उड्या मारू लागला. मग चाहत्यांनाही ही गोष्ट कळावी म्हणून त्यानं व्हिडीओ शेअर केला. आता ही गुडन्यूज काय तर त्यासाठी तुम्हाला कुशलनं शेअर केलेला व्हिडीओच बघावा लागेल.
व्हिडिओत ‘खुशीयों का दिन आया है... जो मांगा वो पाया है..., ’असं म्हणत कुशल नाचत असतो. त्याचा तो आनंद बघून विजू माने त्याला त्याच्या आनंदाचे कारण विचारतात. यावर, दादा गुडन्यूज आहे, असं म्हणतं कुशल मोबाईलवरच्या एका बातमीचा स्क्रिनशॉट त्यांना दाखवतो. ‘नवऱ्याला टोमणे मारणं ही क्रूरता- हायकोर्ट...,’ असं या बातमीत लिहिलेलं असतं. ते वाचून विजू माने सुद्धा आनंदानं उड्या मारू लागतात. कुशलचा हा भन्नाट व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
‘बातमी खूप लोकांना कळू नये म्हणून फक्त तुमच्या पुरतीच ठेवा आणि काही झालं तरी तिच्यापर्यंत पोहाचवू नका,’ असं हा व्हिडीओ शेअर करताना कुशलनं लिहिलं आहे. यावर चाहत्यांनीही तेवढ्याच भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘घरी 100 टक्के फटके आणि मग बायका म्हणतील, खुशीयों का दिन आया है...’, अशी कमेंट एका युजरने केली आहे. कुशल लवकरच ‘जत्रा 2’मध्ये धम्माल करताना दिसणार आहे.