'बिग बॉस'मधून बाहेर आल्यावर सचिन कुमावतची पहिली पोस्ट, काय म्हणाला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 11:07 IST2026-02-23T11:06:46+5:302026-02-23T11:07:05+5:30
सचिन कुमावतनं चाहत्यांसाठी भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

'बिग बॉस'मधून बाहेर आल्यावर सचिन कुमावतची पहिली पोस्ट, काय म्हणाला?
'बिग बॉस' मराठीच्या सहाव्या सिझनमध्ये दर आठवड्यात भन्नाट ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. सहाव्या आठवड्यात कोण घराबाहेर जाणार? याची संपूर्ण आठवडाभर चर्चा सुरू होती. अशातच अखेर रविवारी भाऊच्या धक्क्यावर सर्वांनाच धक्का बसला. सहाव्या आठवड्यामध्ये घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी रोशन, सागर, राकेश, दीपाली, अनुश्री, रुचिता, सचिन, प्रभू आणि प्राजक्ता असे नऊ स्पर्धक नॉमिनेट झाले होते. या स्पर्धकांमधून तीन स्पर्धक डेंजर झोनमध्ये तर उर्वरित सहा स्पर्धक सेफ झोनमध्ये गेले. रोशन, रूचिता आणि सचिन हे तिघे डेंजर झोनमध्ये होते. या तिघांमधून एकाला घरचा रस्ता धरावा लागला आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घरातून खान्देशचा किंग सचिन कुमावतचं एलिमिनेशन झालं. घराबाहेर आल्यावर सचिन कुमावतनं पोस्ट शेअर करत चाहत्यांचे आभार मानलेत.
सचिन कुमावतनं चाहत्यांसाठी भावनिक पोस्ट शेअर केली आहे. सचिनने लिहिले, "बिग बॉस मराठीच्या घरात जाणं अनेकांचं स्वप्न असतं. खान्देशातला एक कलाकार ते बिग बॉस मराठी इथपर्यंतचा हा प्रवास माझ्यासाठी खास होता. एक कलाकार म्हणून सहा आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकू शकलो, तेही कोणाचाही द्वेष न करता, प्रामाणिकपणे खेळत. या संपूर्ण प्रवासात दिलेल्या तुमच्या प्रेमासाठी मनापासून धन्यवाद".
त्याने पुढे म्हटले की, "महाराष्ट्राने दिलेल्या अपार प्रेमाबद्दल मनापासून धन्यवाद. तुमचे आशीर्वाद माझ्यासोबत असेच राहू द्या. लवकरच पुन्हा भेटू". सचिनच्या या पोस्टवर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. आता घरातून बाहेर आल्यावर सचिन कुमावत पुन्हा कोणत्या नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
सचिन कुमावतचा प्रवास
सचिन कुमावत हे नाव खान्देशात घराघरात ओळखीचे आहे. साध्या कुटुंबातून आलेल्या सचिननं आपल्या मेहनतीच्या जोरावर संगीत क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. जळगाव जिल्हातील शेंदुर्नी इथल्या सचिनच्या 'बबल्या ईकस केसावर फुगे' या गाण्यानं सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. यूट्यूबवर या गाण्याला २४ कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसंच सचिनचं 'रस प्यायला ये म्हणलं माय' हे गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरलं झालं होतं.