"मुलाला माझं नाव ठाऊक नव्हतं, पण त्याने सूरजमुळे मला ओळखलं...", रितेश देशमुखने सांगितला खास किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 13:30 IST2026-01-07T13:30:06+5:302026-01-07T13:30:34+5:30
रितेश भाऊला पुन्हा एकदा 'बिग बॉस'चं होस्टिंग करताना पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत रितेश देशमुखने 'बिग बॉस मराठी ५' नंतर घडलेला एक खास किस्सा सांगितला.

"मुलाला माझं नाव ठाऊक नव्हतं, पण त्याने सूरजमुळे मला ओळखलं...", रितेश देशमुखने सांगितला खास किस्सा
Bigg Boss Marathi: 'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन सुरू होण्यासाठी आता अवघे काही दिवस बाकी राहिले आहेत. गेल्या पर्वाप्रमाणेच 'बिग बॉस मराठी ६'चं सूत्रसंचालनही रितेश देशमुख करणार आहे. नुकतंच 'बिग बॉस मराठी ६'ची प्रेस कॉन्फरन्सही पार पडली. रितेश भाऊला पुन्हा एकदा 'बिग बॉस'चं होस्टिंग करताना पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत रितेश देशमुखने 'बिग बॉस मराठी ५' नंतर घडलेला एक खास किस्सा सांगितला.
'बिग बॉस मराठी ६'च्या निमित्ताने रितेशने महाराष्ट्र टाइम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने सूरज चव्हाणच्या चाहत्याच्या खास किस्सा सांगितला. रितेश म्हणाला, "मराठी प्रेक्षकांनी मला नेहमीच भरभरून प्रेम दिलं आहे. 'बिग बॉस मराठी' शोमुळे मला प्रेक्षकांच्या आणखी जवळ जाण्याची संधी मिळाली. मध्यंतरी केदार शिंदे यांच्या 'झापूक झूपुकू' सिनेमाच्या प्रदर्शनादरम्यान एका गावात असताना तिथल्या एका छोट्या मुलानं धावत येऊन मला 'बिग बॉस' अशी हाक मारली. सूरज चव्हाणचा तो चाहता होता. त्याला माझं नावही ठाऊक नव्हतं. पण, त्या मुलानं सूरजमुळे मला ओळखलं".
'बिग बॉस मराठी ५'मध्ये सूरज चव्हाणने त्याच्या साध्या स्वभावाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. या पर्वाचा तो विजेताही ठरला होता. त्यानंतर केदार शिंदेंच्या झापुक झुपूक सिनेमात सूरज मुख्य भूमिकेत दिसला होता. दरम्यान, 'बिग बॉस मराठी ६' हा नवा सीझन येत्या ११ जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. कलर्स मराठीवर रात्री ८ वाजता हे नवे पर्व प्रेक्षकांना पाहता येणार आहे. यंदाच्या पर्वात कोणते स्पर्धक सहभागी होणार, याबाबत चाहत्यांनाही उत्सुकता असून सोशल मीडियावर याची चर्चाही रंगली आहे.