राकेश बापट पुन्हा एकदा 'बिग बॉस'च्या मैदानात, मराठी प्रेक्षकांची मनं जिंकायला सज्ज!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 22:27 IST2026-01-11T22:26:20+5:302026-01-11T22:27:18+5:30
टीव्ही आणि सिनेसृष्टीतील लोकप्रिय 'चॉकलेट बॉय' अभिनेता राकेश बापटने दिमाखदार एन्ट्री घेतली आहे.

राकेश बापट पुन्हा एकदा 'बिग बॉस'च्या मैदानात, मराठी प्रेक्षकांची मनं जिंकायला सज्ज!
Raqesh Bapat in Bigg Boss Marathi 6 : 'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या पर्वाला आज ११ जानेवारीपासून जोरादार सुरूवात झाली आहे. 'बिग बॉस मराठी ६' मध्ये एकापाठोपाठ एक धमाकेदार एन्ट्री होत आहेत. या पर्वात टीव्ही आणि सिनेसृष्टीतील लोकप्रिय 'चॉकलेट बॉय' अभिनेता राकेश बापट याने दिमाखदार एन्ट्री घेतली आहे.
राकेश बापट याने जेव्हा मंचावर एन्ट्री घेतली, तेव्हा त्यानं आपल्या शब्दांनी सर्वांना भारावून टाकले. "आई आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने सर्व चांगलं होईल" असा विश्वासही त्यानं व्यक्त केला. राकेशने रितेशसोबत बोलताना सांगितले की, त्याला अनेक वर्षांपासून मराठीत काम करायची इच्छा होती. "योगायोगाने हिंदीत काम मिळत गेले. पण मराठीत मला खूप वर्षांपासून करायचं होतं. माझ्या आईला खूप इच्छा होती की मी माझ्या मातृभाषेत म्हणजे मराठीत काम करावं. मागच्या वर्षी तिचा ७५ वा वाढदिवस होता. तिला गिफ्ट म्हणून मी एक मराठी मालिका केली आणि प्रेक्षकांनीही त्यावर भरभरून प्रेम दिलं".
मकर संक्रांतीचा सण जवळ येत असल्याने, राकेशच्या आईने खास रितेश देशमुखसाठी तिळगुळ पाठवला होता. घरात प्रवेश करताना रितेशने राकेशसमोर दोन पर्याय ठेवले होते. मात्र, राकेशने कोणत्याही 'शॉर्टकट'चा विचार न करता 'मेहनतीचं दार' निवडलं.
दरम्यान, राकेश याआधी 'बिग बॉस हिंदी'मध्येही दिसला होता. त्यामुळे टास्कची रणनीती आणि घरातील राजकारण कसं हाताळायचं, याचा राकेशला चांगलाच अनुभव आहे. 'हिंदी बिग बॉस'मध्ये आपल्या संयमी स्वभावाने प्रेक्षकांची मनं जिंकल्यानंतर आता राकेश मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. राकेशनं केलेली ही एन्ट्री 'बिग बॉस मराठी ६' मध्ये नवा रंग भरणारी ठरेल, यात शंका नाही. त्याची स्पष्ट भूमिका आणि आत्मविश्वास पुढील दिवसांत घरात कसं वातावरण निर्माण करणार, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.