प्रभू शेळकेला 'बिग बॉस मराठी ६'मध्ये का घेतलं? क्रिएटिव्ह हेडने दिलेलं उत्तर चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 15:02 IST2026-01-31T15:00:46+5:302026-01-31T15:02:30+5:30
अत्यंत गरीब कुटुंबातून आलेल्या प्रभनं सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

प्रभू शेळकेला 'बिग बॉस मराठी ६'मध्ये का घेतलं? क्रिएटिव्ह हेडने दिलेलं उत्तर चर्चेत
'बिग बॉस मराठी'चा सहावा सीझन दिवसेंदिवस अधिक रंगतदार होत चालला आहे. प्रत्येक स्पर्धक चर्चेत येतोय. त्यापैकी एक नाव म्हणजे प्रभू शेळके. तो या पर्वातील सर्वात तरुण स्पर्धकांपैकी एक आहे. त्याच्या निवडीवरून अनेक प्रश्न उपस्थित झाले. प्रभूचा सोशल मीडियावरील कंटेंट 'अश्लील' असून त्याला बिग बॉसमध्ये का घेतलं गेलं, असा प्रश्न अनेकांनी केला. आता यावर शोचे क्रिएटिव्ह हेड केतन माणगावकर यांनी 'सकाळ प्रीमिअर'ला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं आहे.
प्रभू शेळकेच्या वादावर बोलताना केतन माणगावकर यांनी एक महत्त्वाचं उदाहरण दिलं. ते म्हणाले, "एखादा अभिनेता पडद्यावर व्हिलनची भूमिका करतो, याचा अर्थ तो माणूस म्हणून वाईट असतो का? एखादी मुलगी आयटम साँग करते, याचा अर्थ ती घरीही तशीच वागते का? प्रभूचा सोशल मीडिया कंटेंट हा त्याचा परफॉर्मन्स आहे, तो माणूस म्हणून कसा आहे हे 'बिग बॉस'मध्ये कळेल". केतन यांच्या मते, हा शो तुमची 'स्क्रीन इमेज' आणि 'खरा स्वभाव' यातील फरक दाखवण्यासाठी आहे.
केतन यांनी गेल्या सिझनचा विजेता सुरज चव्हाण याचा संदर्भ देत म्हटलं, "सुरज चव्हाण पहिल्या दिवशी जेव्हा आला, तेव्हा अनेकांनी नावं ठेवली होती. मात्र, नंतर तेच लोक त्याच्या मुलाखतीसाठी मागे धावत होते. 'बिग बॉस'मध्ये आल्यावर लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. कधी कधी एक सोज्वळ सुनेची भूमिका करणारी मुलगी असेल, तिची भूमिका खूप गाजली असेल पण सीझन संपेपर्यंत असं कळतं की ती खूप गर्विष्ठ आहे, रागीट आहे. 'बिग बॉस मध्ये असं कुठेही म्हंटलेलं नाही की ह्यांना घ्यायचं नाही, त्यांना घ्यायचं नाही. लोकप्रिय आहे, त्या शोसाठी योग्य आहे, त्यांना आम्ही घेतो. प्रभू यासाठी योग्य वाटला त्यामुळेच त्याची निवड करण्यात आली.
कोण आहे प्रभू शेळके?
प्रभू शेळके हा जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील वलखेड या छोट्याशा गावातील रहिवासी आहे. अत्यंत गरीब कुटुंबातून आलेल्या प्रभनं सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. इंस्टाग्रामवर त्याचे २.३ मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत, ज्यामुळे तो या सीझनमधील सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया स्टार ठरला आहे. तो 'थॅलेसेमिया' या गंभीर आजाराशी झुंज देत आहे. यावर उपचारांसाठी मोठा खर्च येतो. त्याच्या उपचारांसाठी त्याच्या आईवडिलांनी वावर विकल्याचं त्यानं सांगितलं. पण आपल्या आजाराचं भांडवल न करता, चेहऱ्यावर हास्य ठेवून प्रभूनं प्रेक्षकांचे मनोरंजन करणं सुरू ठेवलं.