बिग बॉसच्या घरात स्पर्धकांच्या गळ्यातील माइक प्रचंड महागडा, सलमाननं चुकून उघड केली किंमत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 16:21 IST2025-11-11T16:15:01+5:302025-11-11T16:21:53+5:30
स्पर्धकांच्या गळ्यातील फक्त एका माईकसाठी निर्माते खर्च करतात 'इतके' पैसे? सलमाननं सांगितला आकडा

बिग बॉसच्या घरात स्पर्धकांच्या गळ्यातील माइक प्रचंड महागडा, सलमाननं चुकून उघड केली किंमत
बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान होस्ट करत असलेला टीव्ही रिअॅलिटी शो 'बिग बॉस १९' सध्या तुफान हीट ठरत आहे. १९ व्या या सिझनला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. या शोमध्ये स्पर्धकांवर, त्यांच्या राहण्यापासून ते खाण्यापिण्यापर्यंत, निर्माते कोट्यवधी रुपये खर्च करतात. पण तुम्हाला माहित आहे का, स्पर्धकांच्या गळ्यातील एका माइकची किंमत नेमकी किती आहे? खुद्द होस्ट सलमान खाननेच 'वीकेंड का वार'च्या एका एपिसोडमध्ये चुकून या माइकच्या किमतीचा आकडा उघड केला, ज्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.
'बिग बॉस'च्या घरात स्पर्धक नेहमीच त्यांच्या गळ्यात एक माइक घालतात, ज्यामुळे त्यांचे आवाज प्रेक्षकांना स्पष्ट ऐकू येतात. हा माइक फक्त झोपताना काढण्याची परवानगी असते. जर कोणी तो काढला, तर 'बिग बॉस'कडून लगेच तो परत लावण्याची सूचना मिळते. हा माइक प्रचंड महागडा असल्याचा अंदाज होता, पण त्याची नेमकी किंमत काय आहे, हे पहिल्यांदाच समोर आले.
रविवारी झालेल्या 'वीकेंड का वार' या भागात एक टास्क आयोजित करण्यात आला होता. या टास्कमध्ये सलमान खानने घरातील सदस्यांना भांडणे निर्माण करणाऱ्या दोन स्पर्धकांची जोडी निवडण्यास सांगितले. बहुतांश स्पर्धकांनी फरहाना आणि तान्या यांचे नाव घेतले. टास्कदरम्यान, दोन्ही स्पर्धकांना खुर्च्यांवर बसवण्यात आले आणि त्यांच्या डोक्यावर पक्षांच्या पंखासारख्या वस्तू टाकण्यात आल्या. यावेळी, स्पर्धक फरहानाने तिचा माईक खराब होऊ नये म्हणून मानेवरून काढला आणि खाली फेकला. तेव्हाच, सलमान खानने तिला तो माईक काळजीपूर्वक हाताळण्यास सांगितले. यावेळी तो म्हणाला, "प्रत्येक माइकची किंमत चार लाख पन्नास हजार रुपये आहे, त्यामुळे काळजी घ्या".
डबल इव्हिक्शनची घोषणा
दरम्यान, बिग बॉसच्या गेल्या आठवड्यात दुहेरी इव्हिक्शन (Double Eviction) देखील झाले. गौरव खन्ना, फरहाना भट्ट, नीलम गिरी, अशनूर कौर आणि अभिषेक बजाज हे नॉमिनेट झाले होते. रविवारी नीलम गिरी आणि अभिषेक बजाज हे दोघेही शोमधून बाहेर पडले. हे दोघेही सुमारे ७७ दिवस या शोचा भाग राहिले. आता या आठवड्यात कोण घराबाहेर पडणार, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.