डिलिव्हरीनंतर ५ दिवसांनी भारती सिंगला मिळाला डिस्चार्ज, लगेचच करणार 'लाफ्टर शेफ ३'च्या शूटिंगला सुरुवात?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 15:32 IST2025-12-24T15:32:12+5:302025-12-24T15:32:33+5:30
भारतीला डिलिव्हरीसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता भारती आणि बाळाची प्रकृती ठीक असल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे.

डिलिव्हरीनंतर ५ दिवसांनी भारती सिंगला मिळाला डिस्चार्ज, लगेचच करणार 'लाफ्टर शेफ ३'च्या शूटिंगला सुरुवात?
लाफ्टर क्वीन भारती सिंगने शुक्रवारी (१९ डिसेंबर) तिच्या दुसऱ्या बाळाला जन्म दिला. भारतीने व्हिडीओ शेअर करत तिच्या बाळाची झलकही दाखवली होती. आता डिलिव्हरीनंतर ५ दिवसांनी भारती सिंगला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. भारतीला डिलिव्हरीसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता भारती आणि बाळाची प्रकृती ठीक असल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे.
हॉस्पिटलमधून बाहेर आल्यानंतर भारती पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. भारतीसोबत तिचा पती हर्ष लिंबाचियादेखील दिसत आहे. पापाराझींशी बोलतानाही भारतीचा कॉमेडी अंदाज दिसला. भारतीला पापाराझींनी "काजू कसा आहे?" असा प्रश्न विचारला. तिने कॉमेडी करत "काजू पक चुका है" असं उत्तर दिलं. त्यानंतर ती म्हणाली, "तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना केली यासाठी धन्यवाद. काजू ठीक आहे आणि आता आम्ही त्याला घरी घेऊन जात आहोत". भारती आणि हर्षने सगळ्यांचे आभारही मानले.
गरोदर असतानाही भारती लाफ्टर शेफ ३चं शूटिंग करत होती. पण, डिलिव्हरीनंतर तिला शूटिंग करणं जमलेलं नाही. तिने व्लॉगमध्ये सांगितलं होतं की दोन एपिसोडचं शूटिंग करायला न जमल्याने ते भाग अर्जुन बिजलानीने होस्ट केले आहेत. त्यामुळे आता डिस्चार्ज मिळाल्यानंतर भारती लगेचच शूटिंगला सुरुवात करणार का, हे पाहावं लागेल.
दरम्यान, भारती आणि हर्ष लिंबाचिया यांनी २०१७ मध्ये लग्न केलं होतं. २०२२ मध्ये भारतीने तिच्या पहिल्या बाळाला जन्म दिला होता. त्याचं नाव लक्ष असं आहे. त्याला सगळे लाडाने गोला बोलतात. तर भारतीने दुसऱ्या लेकाचं निकनेम काजू असं ठेवलं आहे.