"लादलं तर ओझं, स्वीकारलं तर कर्तव्य..." पंढरपूर वारीविषयी काय म्हणाला अजिंक्य राऊत?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2025 16:52 IST2025-07-06T16:49:27+5:302025-07-06T16:52:18+5:30
अभिनेता अजिंक्य राऊतनेही पंढरपूर वारीमध्ये पायी प्रवास अनुभवला.

"लादलं तर ओझं, स्वीकारलं तर कर्तव्य..." पंढरपूर वारीविषयी काय म्हणाला अजिंक्य राऊत?
Ashadhi Ekadashi 2025: आज आषाढी एकादशीच्या शुभदिनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी पंढरपूरात दाखल झाले आहेत. पांडुरंगाच्या दर्शनासाठी आसुसलेले हे भाविक विठ्ठलनामात तल्लीन झालेले दिसत आहेत. श्रद्धा, भक्ती आणि सेवाभावाचा हा महासागर दरवर्षी प्रमाणे यंदाही पंढरपूरात अवतरला आहे. यंदाच्या वारीत मराठी अभिनेता अजिंक्य राऊत ही सहभागी झाला होता. अजिंक्य राऊत याने स्वतः पंढरपूरपर्यंतचा पाच दिवसांचा पायी प्रवास केला आणि हजारो भाविकांसोबत चालत वारीचा आत्मिक गोडवा अनुभवला. "लादलं तर ओझं, स्वीकारलं तर कर्तव्य" या मोजक्या शब्दात अजिंक्यनं वारीचं सार सांगितलं.
अजिंक्य राऊत हा झी टॉकीजवरील 'मन मंदिरा' या कार्यक्रमाचे निवेदन करतोय. यानिमित्ताने त्याने वारीचा अनुभव घेतला. अभिनेता म्हणाला, "जसं आपण एखादा किंवा मॅरेथॉनमध्ये सहभागी होतो, खडतर वाटा पार करत, अनोळखी लोकांबरोबर जुळवून घेत... तसं काहीसं, पण हजारपटीने खोल, वारीत अनुभवायला मिळतं. इथे ऊन, पाऊस, थकवा, भूक सगळं विसरून माणसं चालतात. कोणत्याही मोबदल्याशिवाय, फक्त श्रद्धा आणि प्रेमामुळं".
या वारीत अजिंक्यला अनेक भाविक भेटले. एक वारकरी अजिंक्यला म्हणाला, "दरवर्षी आमचं संपूर्ण कुटुंब, नातेवाईक एकत्र येतो. ही चाल आम्हाला केवळ विठोबाजवळ नेते असं नाही, तर आम्हा सगळ्यांना एकमेकांजवळ आणते. या प्रवासातून आम्हाला पुढच्या वर्षासाठी ऊर्जा मिळते. म्हणून आम्ही दरवर्षी येतो". याशिवाय 'विठू माऊलीचं वस्त्र बनवणारा कॅन्टर'देखील या वारीमध्ये होतं. झी टॉकीजने हा विशेष उपक्रम हाती घेतला होता. विठोबाच्या वस्त्रनिर्मितीमध्ये पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या अनेक भाविकांनी हातभार लावला. शेवटी अजिंक्यने वारीविषयी असेही म्हटले की, "वारी ऐकून कळत नाही, ती चालल्यावरच उमगत जाते… आणि एकदा उमगली की ती आयुष्यभर आपल्याला साथ देते!".