छोट्या लक्ष्या बनला अप्पी-अर्जुनचा अमोल, व्हिडिओवर होतोय कौतुकाचा वर्षाव, नेटकरी म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 13:26 IST2024-07-31T13:25:48+5:302024-07-31T13:26:09+5:30
साईराजने दिवंगत अभिनेते सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या गाण्यावर रील बनवला आहे. लक्ष्याच्या 'झपाटलेला' सिनेमातील गाण्यावर साईराजने व्हिडिओ बनवला आहे.

छोट्या लक्ष्या बनला अप्पी-अर्जुनचा अमोल, व्हिडिओवर होतोय कौतुकाचा वर्षाव, नेटकरी म्हणाले...
बालकलाकार साईराज केंद्रे हा अप्पी आमची कलेक्टर मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. मालिकेत तो अपर्णा आणि अर्जुनचा मुलगा अमोल ही भूमिका साकारत आहे. अप्पी आणि अर्जुनला एकत्र आणण्यासाठी अमोल शर्थीचे प्रयत्न करताना मालिकेत दिसत आहे. या चिमुकल्याच्या लडिवाळ अभिनयाचं सर्वत्र कौतुकही होत आहे. पण, सध्या मात्र साईराज वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे.
आमच्या पप्पांनी गणपती आला या गाण्यामुळे प्रसिद्धीझोतात आलेला साईराज सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. ट्रेंडिंग गाण्यावर साईराज रील व्हिडिओ बनवताना दिसतो. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलही होत असतात. आता साईराजने दिवंगत अभिनेते सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या गाण्यावर रील बनवला आहे. लक्ष्याच्या 'झपाटलेला' सिनेमातील गाण्यावर साईराजने व्हिडिओ बनवला आहे.
साईराज केंद्रेच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत साईराज "चला उडवून देऊ बार, लगीनसराईला" या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. त्याचा हा डान्स पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. त्याचा हा व्हिडिओ पाहून चाहत्यांना त्यांच्या लाडक्या लक्ष्याची आठवण आली आहे.
या व्हिडिओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी साईराजचं कौतुक केलं आहे. "हा एकच असा बालकलाकार आहे...ज्याने सर्वांची मनं जिंकली खूप छान बेटा नटखट कलाकार", "या वर्षी गणपतीचे आणखी एक गाणं होऊन जाऊ दे ", "छोटा लक्षा दादा...आज आठवण करून दिलीस", "साई कसला गोड आहेस रेठ, "अरे बापरे little लक्ष्या" अशा कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत.