"मुलाची आई माझ्याशी कचाकचा भांडली...", लग्नासाठी मॅट्रीमोनियलवर मुलगा शोधत होती अमृता देशमुख, सांगितला अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 13:08 IST2025-09-07T13:07:57+5:302025-09-07T13:08:33+5:30
प्रसादशी लग्न करण्याआधी अमृता लग्नासाठी मुलं पाहत होती. तेव्हा तिला काही वेगळे अनुभव आले होते. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत याचा उलगडा अमृताने केला.

"मुलाची आई माझ्याशी कचाकचा भांडली...", लग्नासाठी मॅट्रीमोनियलवर मुलगा शोधत होती अमृता देशमुख, सांगितला अनुभव
अमृता देशमुख हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय नाव आहे. अनेक मालिका, सिनेमा आणि नाटकांमध्येही तिने काम केलं आहे. बिग बॉस मराठीमुळे अमृता चर्चेत आली होती. या पर्वातील ती चर्चेतील चेहऱ्यांपैकी एक होती. बिग बॉसच्या घरातच अमृताचे प्रसाद जवादेशी सूर जुळले आणि नंतर त्यांनी लग्नही केलं. पण, प्रसादशी लग्न करण्याआधी अमृता लग्नासाठी मुलं पाहत होती. तेव्हा तिला काही वेगळे अनुभव आले होते. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत याचा उलगडा अमृताने केला.
अमृताने मॅट्रीमोनियल साइट्सवर लग्नासाठी नावनोंदणी केली होती. याचाच एक अनुभव तिने सर्व काही या पॉडकास्टमध्ये सांगितला. ती म्हणाली, "एकदा असा प्रकार घडला होता की मुलाची आई आणि त्या मुलामध्येच काही नीट बोलणं नव्हतं. त्या मुलाला मॅट्रीमोनियलवर यायचं होतं, माझ्याशी बोलायचं होतं. पण त्याच्या आईला माझ्याशी बोलायचं नव्हतं. त्याची आई माझ्याशी फोनवर कचाकचा भांडली. त्या म्हणाल्या की मी त्याला नाही सांगितलंय त्याला नाही करायचंय लग्न वगैरे. मी त्यांना म्हटलं की अहो आता मी त्याच्याशी बोलले तो मला म्हणाला की त्याला काहीच प्रॉब्लेम नाहीये. मग नेमका काय प्रॉब्लेम आहे?".
"तेव्हा त्या म्हणाल्या की आम्हाला अभिनय क्षेत्रातली मुलगी नकोय. मग मला असं झालं की यांची खूपच बेसिकपासून सुरुवात आहे. त्यांना मी म्हटलं की ठीक आहे तुम्हाला वाटतंय की अभिनेत्री सून म्हणून नकोय. मला तेच कळत नाही की इतर क्षेत्रातील मुली सून म्हणून असे काय दिवे लावतात की अभिनेत्रींवर ताशेरे ओढले जातात? असं काही नसतं. माणूस माणूस असतो. त्याच्या सद्सदविवेकबुद्धीचा त्याच्या क्षेत्राशी काहीही संबंध नसतो", असंही अमृता पुढे म्हणाली.