सौंदाळा ग्रामपंचायतीकडून 'जात मुक्त गाव'ची घोषणा, अभिनेत्याच्या पत्नीनं व्यक्त केला आनंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 13:19 IST2026-02-12T13:16:58+5:302026-02-12T13:19:08+5:30
अहिल्यानगर जिल्ह्यातल्या नेवासा तालुक्यातलं सौंदाळा हे गाव 'जातमुक्त गाव' म्हणून घोषित करण्यात आलं.

सौंदाळा ग्रामपंचायतीकडून 'जात मुक्त गाव'ची घोषणा, अभिनेत्याच्या पत्नीनं व्यक्त केला आनंद
देशात आजही अनेक ठिकाणी जाती-पातीचं राजकारण आणि भेदभाव पाहायला मिळतो. जातीचा अभिमान बाळगण्याची आणि त्यादृष्टीने कृत्ये केल्याची उदाहरणे अनेकदा समोर येतात. यात ऑनर किलिंग, सामाजिक बहिष्काराच्या घटनाही घडतात. मात्र, अहिल्यानगर जिल्ह्यातल्या नेवासा तालुक्यातलं सौंदाळा हे गाव 'जातमुक्त गाव' म्हणून घोषित करण्यात आलं. तसा ठराव विशेष ग्रामसभेत मंजूर करण्यात आला. रक्तदान शिबीर घेऊन त्यानंतर जातमुक्तीचा ठराव घेण्यात आला. या निर्णयाचे सोशल मीडियावर कौतुक होत असतानाच, अभिनेता अंशुमन विचारे याची पत्नी पल्लवी विचारे हिने केलेली पोस्ट विशेष लक्ष वेधून घेत आहे.
राज्यात जातीय अस्मिता तीव्र होत असताना एका गावानं मात्र थेट जातीच्या भिंतीच उद्ध्वस्त केल्याच पाहून पल्लवी विचारे हिने आनंद व्यक्त केला आहे. तिनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिले की, "आज सकाळी ही बातमी पाहून खूप आनंद झाला. पण आजही जात-पात करणाऱ्या शिकलेल्या अडाणी लोकांची खूप कीव आली, या शब्दात तिनं समाजातील सुशिक्षित लोक आजही जातीभेदाच्या भिंती कशा उभा करतात, यावर नेमके बोट ठेवले.
पुढे तिनं लिहलं, "खरंच आपण जातमुक्त होऊ शकतो का? अंशुमन नेहमी म्हणतो की माणसाच्या फक्त दोनच जाती असतात, एक चांगला माणूस किंवा दुसरा हरामखोर! त्याचं हे वाक्य मला भयंकर आवडतं", असं तिनं पोस्टच्या शेवटी म्हटलं. पल्लवीच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कमेंट्स करत तिचे समर्थन केले आहे.
सौंदाळा गावाने घालून दिला आदर्श
सौंदाळा गावची लोकसंख्या २५०० एवढी आहे. शेती हा इथल्या लोकांच्या उदरनिर्वाहाचा प्रमुख स्रोत आहे. सौंदाळा गाव हे कायमच समाजहिताचे, प्रगत आणि प्रेरणादायी निर्णय घेणारे गाव म्हणून ओळखले जाते. याआधी शिवीगाळ बंदी, विधवा पुनर्विवाहास प्रोत्साहन, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विविध योजना तसेच गावाच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक महत्त्वाचे ठराव सौंदाळा ग्रामपंचायतीमार्फत मंजूर करण्यात आले आहेत. एकीकडे जातीय तेढ वाढत असताना, आता सौंदाळा गावाने घेतलेला 'जात मुक्त गाव'चा हा निर्णय महाराष्ट्रासाठी दिशादर्शक ठरणार आहे.
