कोणाचे ३ लाख तर कोणाचे ३.५० लाख बुडवले; शशांकनंतर मराठी कलाकारांकडून मंदार देवस्थळींची पोलखोल
By कोमल खांबे | Updated: January 6, 2026 12:21 IST2026-01-06T12:21:05+5:302026-01-06T12:21:55+5:30
अभिनेता शशांक केतकरने मन हे बावरे मालिकेचे निर्माते आणि दिग्दर्शक यांच्यावर पैसे थकवल्याचे गंभीर आरोप केले. मेसेजचे स्क्रीनशॉट शेअर करत शशांकने व्हिडीओतून अनेक वर्ष पैसे मागितल्यानेही न दिल्याचा आरोप मंदार देवस्थळींवर केला आहे. शशांकच्या या पोस्टवर इतरही काही मराठी कलाकारांनी मंदार देवस्थळींनी पैसे बुडवल्याचं म्हटलं आहे.

कोणाचे ३ लाख तर कोणाचे ३.५० लाख बुडवले; शशांकनंतर मराठी कलाकारांकडून मंदार देवस्थळींची पोलखोल
अभिनेता शशांक केतकरने मन हे बावरे मालिकेचे निर्माते आणि दिग्दर्शक यांच्यावर पैसे थकवल्याचे गंभीर आरोप केले. मेसेजचे स्क्रीनशॉट शेअर करत शशांकने व्हिडीओतून अनेक वर्ष पैसे मागितल्यानेही न दिल्याचा आरोप मंदार देवस्थळींवर केला आहे. त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचंही त्याने म्हटलं आहे. शशांकच्या या पोस्टवर इतरही काही मराठी कलाकारांनी मंदार देवस्थळींनी पैसे बुडवल्याचं म्हटलं आहे.
शशांकच्या पोस्टवर अभिनेत्री विदिशा म्हसकरची कमेंट
अभिनेत्री विदिशा म्हसकरने शशांकच्या पोस्टवर कमेंट करत ३ लाख थकवल्याचं म्हटलं आहे. विदिशा मन हे बावरे मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत होती. "माझेही TDS सहित जवळपास ३ लाख रुपये आहेत. त्यावेळी आम्ही बोललो म्हणून आम्हाला ट्रोल केलं गेलं. चुकीचं ठरवलं गेलं. आपल्या इंडस्ट्रीमध्ये हे असंच चालतं, असं आम्हाला ऐकवलं गेलं. नंतर ही गोष्टच आपण सोडून दिली. या अनुभवातून चांगला धडा घेऊन मी ठरवलं की हेच प्रयत्न मी माझ्या पुढच्या कामात लावेन. जॉब, व्यवसाय बाकी सगळ्या गोष्टींसाठी कायदे आहेत. पण, आमच्या इंडस्ट्रीसाठी एकही कायदा नाही, हे वाईट आहे", असं विदिशाने म्हटलं आहे.

"कामाच्या तासापासून, वीकेंड किंवा पेमेंटपर्यंत कशाचेच कायदे किंवा नियम नाहीत. मी याविषयी खूप वकिलांशी बोलले होते की काही होऊ शकतं का...पण काहीच झालं नाही. नॉन स्टॉप एंटरटेनमेंट सगळ्यांना हवं आहे पण त्यासाठी रोज १४-१४ तास काम करणंच चालत आलंय. तेही आम्ही आनंदाने करतो. पण त्या बदल्यात आम्हाला हे मिळतंय", असं म्हणत विदिशाने संताप व्यक्त केला आहे.
संग्राम समेळचेही मंदार देवस्थळींवर आरोप
संग्रामनेही शशांकच्या पोस्टवर कमेंट करत त्याचे तब्बल ३.५ लाख रुपये येणं बाकी असल्याचं सांगितलं आहे. "माझेही अजूनही जवळपास ३.५ लाख बाकी आहेत. TDS तर बोलायलाच नको. मागे ५ वर्षांपूर्वी आम्ही जेव्हा पोस्ट केली होती तेव्हा दादाला पाठिंबा देणारे काही लोक अचानक उभे राहिले. ४००-५०० लोक...त्यांनी ५००-५०० रुपये काढले असते तरी आपले थोडे फार पैसे मिळाले असते", असं कमेंटमध्ये संग्राम समेळने म्हटलं आहे.

शशांकच्या पोस्टवर इतरही काही कलाकारांनी कमेंट केल्या आहेत. पण अद्याप यावर मंदार देवस्थळींकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.