तो असा माणूस नाहीये म्हणणाऱ्यांना अभिनेत्रीने दिलं चोख उत्तर, म्हणाली - मेसेज केल्याचं त्यांनी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 12:41 IST2025-05-26T12:24:08+5:302025-05-26T12:41:48+5:30
Prachi Pisat : अभिनेत्री प्राची पिसाटला सुदेश म्हशिळकर यांनी आक्षेपार्ह मेसेज केले आहेत. अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावर मेसेजचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत.

तो असा माणूस नाहीये म्हणणाऱ्यांना अभिनेत्रीने दिलं चोख उत्तर, म्हणाली - मेसेज केल्याचं त्यांनी...
सिनेइंडस्ट्रीत अनेकदा कलाकारांना कास्टिंग काउचचा सामना करावा लागतो. कधीकधी त्यांना कामाच्या ठिकाणी अपमानास्पद वागणूक मिळते किंवा सहकलाकाराने केलेल्या वाईट वर्तणुकीबद्दल ऐकायला मिळतो. नुकतेच मराठी टेलिव्हिजनवरील एका अभिनेत्रीने तिला दिग्गज मराठी अभिनेत्याकडून मिळालेल्या वाईट अनुभवाबद्दल खुलासा केला आहे. ही अभिनेत्री म्हणजे प्राची पिसाट (Prachi Pisat). प्राचीने सोशल मीडियावर सुदेश म्हशिळकर यांनी केलेल्या घाणेरड्या मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर करत त्यांची घाणेरडी मानसिकता समोर आणली आहे. मात्र काही लोक या अभिनेत्याची बाजू घेताना दिसत आहेत. त्यांनाही अभिनेत्रीने चांगलेच उत्तर दिले आहे.
सुदेश म्हशिळकर यांनी प्राची पिसाट हिला सोशल मीडियावर केलेल्या मेसेजचा स्क्रीनशॉट तिने शेअर केला आहे. यात सुदेश यांनी इन्स्टाग्राम आणि फेसबुक अशा दोन्ही ठिकाणी प्राचीला मेसेज केलेत. मेसेज करत त्यांनी अभिनेत्रीकडे थेट तिच्या फोन नंबर मागितला. इतकंच नाही तर फ्लर्ट करायची इच्छा झाल्याचंही म्हटलं आहे. तसेच "खूपच सेक्सी दिसायला लागलीस हल्ली...वाह", असंही सुदेश यांनी मेसेजमध्ये म्हटलं आहे. प्राचीने हे स्क्रीनशॉट फेसबुकवर शेअर करत लिहिले की, आणि मला हा स्क्रीनशॉट पोस्ट करायची इच्छा झाली...बायकोचा नंबर असेलच..ते हे गोड आहे. बघ जरा तिच्याशी फ्लर्ट करायला जमतंय का सुदेश म्हशिळकर. ही पोस्ट डिलीट कर सांगायला कुठून तरी नंबर मिळवशील आणि कॉल करशीलच.
प्राचीच्या या फेसबुक पोस्टवर अनेकांनी तिला पाठिंबा दर्शवला आहे. अभिनेत्री शिल्पा नवलकरने कमेंटमध्ये लिहिले की, योग्य केलंस प्राची. गप्प नाही बसायचं. तर काहींनी हे सुदेश यांनी केलं नसल्याचे म्हटले आहे. तर काही अभिनेत्या कलाकारांनीही सुदेश यांची बाजू घेत हे सुदेशने केलेलं नाहीये..तो फेसबुक वर अनेक दिवस लॉग इन नाहीये..आणि तो असा माणूस नाहीये. त्याचं अकाउंट हॅक झालं असेल असे म्हटलंय.
त्यावर अभिनेत्रीने त्यांना चोख उत्तर दिलंय. ती म्हणाली की, त्यांनी मला मेसेज केल्याबद्दल काही लोकांना सांगितले. अकाउंट हॅक झालं असं म्हणणाऱ्यांवर प्राची म्हणाली की, हो असू शकतं. पण हॅकर मराठी होता आणि अनेक महिने मुलींना मेसेज करत असेल. बरं झालं. माझ्या निमित्ताने कळलं तरी असे मेसेज करतोय. आणि हो हुशार पण होता. लगेच अनफ्रेंडसुद्धा केलं त्या हॅकरने. अनेकांनी प्राचीने उचललेल्या या पावलाचं कौतुक केलं आहे. मात्र प्राचीने केलेल्या या आरोपांवर अद्याप सुदेश यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.