'बिग बॉस १९' फेम अभिनेत्यासोबत प्रेमसंबंध? अभिनेत्रीने दिला कायदेशीर कारवाईचा इशारा, म्हणाली-
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 16:00 IST2025-11-27T15:58:15+5:302025-11-27T16:00:20+5:30
सध्या सुरु असलेल्या बिग बॉस १९ मधील एका स्पर्धकासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांनंतर प्रसिद्ध अभिनेत्रीने थेट कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. काय म्हणाली?

'बिग बॉस १९' फेम अभिनेत्यासोबत प्रेमसंबंध? अभिनेत्रीने दिला कायदेशीर कारवाईचा इशारा, म्हणाली-
टेलिव्हिजन आणि मनोरंजन क्षेत्रात कार्यरत असलेल्या अभिनेत्रीने तिचं नाव एका अभिनेत्यासोबत जोडल्याने वैतागून अफवा पसरवणाऱ्यांवर थेट कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. ही अभिनेत्री आहे डोनल बिश्त (Donal Bisht). डोनलने 'बिग बॉस' फेम अभिनेता अभिषेक बजाजसोबतच्या (Abhishek Bajaj) प्रेमसंबंधांच्या खोट्या अफवांवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
अभिषेक बजाज सध्या सुरु असलेल्या 'बिग बॉस १९'मध्ये सहभागी होता. त्यामुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा या दोघांच्या नावाची चर्चा सुरू झाल्यानंतर डोनलने थेट कायदेशीर कारवाईचा इशारा देत या प्रकरणाला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतला आहे.
काही दिवसांपूर्वी अभिषेक बजाजच्या पूर्वीच्या लग्नाबद्दल आणि पत्नी आकांक्षा जिंदालबद्दल पुन्हा चर्चा सुरू झाली होती. अशातच अभिनेत्री डोनल बिश्तचे नाव या प्रकरणाशी जोडले गेले. या दोन्ही कलाकारांनी काही वर्षांपूर्वीच अशा अफवा फेटाळून लावल्या होत्या आणि त्यांच्यात कोणतेही प्रेमसंबंध नसल्याचे स्पष्ट केले होते. तरीही, त्यांच्याबद्दल चुकीच्या बातम्या बाहेर येताना दिसल्या.
यावर प्रतिक्रिया देताना डोनल बिश्तने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक अत्यंत स्पष्ट आणि कठोर मेसेज सर्वांना दिला आहे. तिने म्हटले आहे की, "मी शूटिंगसाठी बाहेरगावी होते, त्यामुळे या गोष्टींकडे लक्ष देता आले नाही, पण आता मी इथे आहे आणि मला इतकेच म्हणायचे आहे की, माझं नाव विनाकारण या फालतू गोष्टींमध्ये ओढणे थांबवा! जर तुम्हाला खरं माहित नसेल, तर कृपया अशा खोट्या अफवा पसरवू नका. मी हे सहन करणार नाही!"
डोनलने पुढे स्पष्ट केले की, कोणताही खोटा आरोप किंवा बदनामी सहन केली जाणार नाही आणि यापुढे असे करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. "लोक फक्त त्यांच्या फायद्यासाठी किंवा लक्ष वेधून घेण्यासाठी तुमचा आणि तुमच्या नावाचा वापर करतात. पण आता मी या गोष्टींवर आता पूर्णविराम देत आहे," असं डोनलने स्पष्ट केलं.
डोनलने तिच्या अनेक वर्षांच्या कामातून लोकप्रियता मिळवली आहे. ती एका प्रतिष्ठित कुटुंबातील असून तिचं कोणत्याही वादात नाव आलं नाहीये. ती केवळ अभिनयाच्या आणि कलेच्या प्रेमापोटी या उद्योगात आहे. त्यामुळेच विनाकारण कोणाच्याही वैयक्तिक आयुष्यातील खोट्या गोष्टींचा भाग तिला व्हायचं नाहीये.